गेवराई (रिपोर्टर) माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रामकथा ज्ञानयज्ञाचा आज समारोप होत असून आजच्या शेवटच्या सत्रामध्ये रावण वध व प्रभु श्री रामचंद्रांच्या रामराज्याभिषेक यावर रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक आपल्या अमृततुल्य वाणीतून रामकथा सादर करणार आहेत. आज दुपारी ३ वाजता होणार्या या रामकथा ज्ञानयज्ञास भाविक भक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवाजीराव (दादा) पंडित अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या किर्तन महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिध्द रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचा रामकथा ज्ञानयज्ञ सुरु असून या रामकथेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या या रामकथेमध्ये रामराव महाराज ढोक यांनी रामायण ग्रंथ महात्मे, शिव पार्वती विवाह, श्रीराम जन्म, अहिल्या उध्दार व सिता स्वयंवर, राम वनवास व केवट कथा, भरत भेट व सिताहरण, बाली वध व लंका दहन आदी प्रसंग आपल्या सुश्राव्य वाणीतून सादर करून गेवराई येथील र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या शिवनगरी मैदानावर रामराज्य उभारले आहे.
आज कथेचा शेवटचा दिवस असून दुपारी तीन वाजता होणार्या या रामकथेत रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक आपल्या सुश्राव्य वाणीतून रावण वध व प्रभू श्री रामचद्रांच्या रामराज्याभिषेकाचे वर्णन करणार आहेत. या रामकथेस भाविक भक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवाजीराव (दादा) पंडित अभिष्टचिंतन सोहळा समितीच्याव तीने करण्यात आले आहे.