आष्टा महसूल मंडळात सर्वात जास्त पाऊस, अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प, आज सकाळी 7 वाजल्यापासून पाऊस सुरूच
आष्टी । अक्षय विधाते
तालुक्यात परतीच्या पावसाचा कहर सुरुच आहे.मागिल 15 दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला असुन आज पुन्हा सकाळपासूनच विजेच्या कडकडाटासह कोसळधाराने तब्बल 2 तास धुमाकूळ घातल्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत परतीच्या पावसाने कोसळधारा सुरुच ठेवल्या. त्यामुळे काढणीला आलेली पिके संकटात आली आहेत. पांढरी परिसर आष्टा महसूल मंडळात सकाळी ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.बीड अहमदनगर महामार्गावर वाहतूक विस्कळित झाली आहे.रोड वरुन गुडघ्या पर्यंत पाणी वाहत होते.प्रवासी जिवे धोक्यात घालून प्रवास करत आहेत.पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्यांचे हातातील पीक गेल्याने हवालदिल झाले आहेत.तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असुन मागिल 15 दिवसांपासून पाठ सोडायला पाऊस तयार नाही आज पुन्हा सकाळपासूनच ढगफुटी सदृश्य पाऊस झाला जोरदार पावसाने पांढरी,करंजी,पांगुळगव्हाण, क-हेवडगांव,क-हेवाडी,मातकुळी,वनवेवाडी, पोखरी,हाजीपुर,या परिसरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले नदी नाल्यांना पुर आल्याने वाहतूक ठप्प आहे.काही गावांचा संपर्क देखील तुटला गावातील ग्रामस्थांना पुलावरून पाणी वाहत असल्याने अडकून पडले होते.विद्यार्थी,नौकरदार,दुध घेऊन जाणारे शेतकरी जोरदार पावसामुळे घरातच अडकून पडले आहेत.पांढरी व आष्टा महसूल मंडळ परिसरात सकाळी 9 वाजेपासून पावसाने हाहाकार माजवला असुन शेत जलमय झाले आहेत.पूर्ण शेत पिक पाण्याखाली आहे.शेतक-यांचे अतोनात नुकसान झालं शेतांना तळ्यांचे स्वरुप प्राप्त झाल्याने सोयाबीन कोंब येण्याची भीती आहे. कापुस,कांदा,तुर पीक शेतात झोपल्याने झडण्यासह पाण्यात कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोसावलेली पिके अशा पद्धतीने संकटात आल्याने बळीराजाचे दु:ख काही संपत नाही, अशी स्थिती आहे.
सोलेवाडीचा पुल तुटल्याने 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला नदी शेजारील घरात पाणी घर सोडून नागरीकांचे स्थलांतर
तालुक्यातील सोलेवाडी येथील नगर जिल्ह्यातील गावांना जोडणारा पुल परतीच्या पावसाने वाहुन गेला आहे. सकाळपासून पूर आल्याने या मार्गावरील जामगांव, देविगव्हाण, वाळुंज, डोणगांव, अरणगांव, पारेवाडी, या गावातील विद्यार्थी, नौकरदार, नागरिक वाहतूक दुपारपर्यंत ठप्प आहे. या गावांचा संपर्क तुटला आहे. तर सोलेवाडी येथील नदीच्या बाजूच्या घरात पाणी शिरले असून जिवन उपयोगी वस्तू पाण्यात आहेत. अतोनात नुकसान ह्या पावसाने झाले आहे. पुरस्थिती निर्माण झाली आहे. तात्काळ शेतकर्यांना मदत देऊन पूल बांधण्याची मागणी राम झगडे यांनी केली आहे.
पांढरी परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने शेत जलमय जमिन खोदून गेल्या बळीराजाचे अतोनात नुकसान
सकाळपासूनच पांढरी परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले असून गावातील शेतकर्यांनी कांदा, ज्वारी पिकाची पेरणी केली आहे. व कापुस तुर, कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्व पिके पाण्यात असून जमिन खोदून गेली आहे. बळीराजाचे आस्मानी संकटाने अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्यांना तात्काळ पंचनामे करून मदत ही दिवाळी पूर्वी द्यावी जेणेकरून बळीराजाची हि दिवाळी गोड होईल.
– सुधिर पठाडे (सरपंच, पांढरी)
विमा कंपनीने स्वत: पंचनामे करावेत-आ.धस
परतीच्या पावसामुळे आष्टी तालुक्यातल्या काही मंडळात प्रचंड नुकसान झाले आहे. जमिनी खरडून वाहून गेल्या आहेत. प्रशासन यावर नजर ठेवून असली तरी पुढचे काही दिवस पंचनाम्याला जातील. खरिपाचे पिक हातातून गेल्याचे सांगत विमा कंपनी शेतकर्यांना नुकसानीचे फोटो अपलोड करायला सांगते परंतू शेतकर्यांना ते जमत नाही. त्यामुळे स्वत: कंपनीने या भागात येवून पंचनामे करत अपलोड करावे. अशी मागणी आ.सुरेश धस यांनी केली.