बीड (रिपोर्टर) पाच दिवसांपासून बीड जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कालही जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस पडल्याने कापूस, सोयाबीन, बाजरीसह इतर पिके पाण्यात गेली. शेकडो हेक्टरमधील पिके पाण्यात असल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार. कालच्या पावसात पाच मंडलामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली.
काल झालेल्या धुव्वाधार पावसामुळे चौसाळा मंडलात 70.5, अंमळनेर 66.00, आष्टी 66.5, अंबाजोगाई 66.3, लोखंडी सावरगाव 71.8 या पाच मंडलामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. पाऊस अंदाजपचे मोजला जात असल्याचाही आरोप होत आहे. काही ठिकाणी जास्त पाऊस पडत असला तरी कमी दाखवला जात आहे. पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाला आलेला घास हिसकावून घेतला. जो कापूस वेचणीसाठी आला होता त्या कापसाच्या वाती झाल्या. अनेक शेतकर्यांनी सोयाबीन काढून ठेवले होते. त्याचे नुकसान झाले तर काही शेतकर्यांचं सोयाबीन काढणीअभावी शेतात पडून आहे. जिल्हभरातील शेकडो हेक्टर कापूस, सोयाबीन अक्षरश: पाण्यात असल्याने सदरील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्याची मागणी होऊ लागली आहे.