बीड (रिपोर्टर ):- परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात हाहाकार उडवून सोडला. गेल्या तीन दिवसांच्या कालखंडामध्ये आष्टी, पाटोदा, परळी, अंबाजोगाई, बीड, गेवराईसह आदी तालुक्यांमध्ये धुव्वाधार पाऊस झाला. शेतातील खरीपाचे पिके अक्षरश: पाण्यात गेले. अशी गंभीर परिस्थिती आणि शेती पिकाचे महाभयंकर नुकसान झाल्यानंतरही शासन-प्रशासन नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत कागदी घोडे नाचवून ऑनलाईनचा डांगोरा पिटवत आहेत. विमा कंपनी नुकसानीबाबत ऑनलाईन फोटो डाऊन लोड करण्याच्या सूचना देत आहे. शेतकरी बांधावर गेला तर विमा कंपनीचे सर्वर डाऊन राहते. यामुळे संतापलेले शेतकरी अशा व्यवस्थेला उद्देशून साल्यांना खेटराने मारलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. विमा कंपनीने नुकसानीबाबतचे फोटो अपलोड करण्याबाबत आजची शेवटची तारीख आहे. त्यात सर्वर शंभर टक्के बंद आहे.
याबाबत अधिक असे की, परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकर्यांची दाणादान उडवून सोडली आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर, परळी, अंबाजोगाई, धारूर, वडवणी, बीड, गेवराई, माजलगाव तालुक्यातील बहुतांशी मंडळांमध्ये अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला. नद्या नाल्यांचे पाणी शेतात घुसले. सोयाबीन, कापसासह खरीपाचे अन्य पिक अक्षरश: पाण्यात गेले. शेतकर्यांची कधीही न भरून येणारी पिकांची हाणी झाली. हातोंडाला आलेले पीक अक्षरश: उद्ध्वस्त झाले. हे सर्व उघड्या डोळ्याने शेतकरी तर पहातच आहे, गेंड्याची कातडी पांघरलेल्या शासन-प्रशासनालाही ते दिसत आहे मात्र शेतकर्यांना आणखी अडचणीत सापडायचे, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करायची नाहीत, असा अडेलतट्टू दंडकच जणू शासन व्यवस्थेने आणि प्रशासनातील बाबूंनी घेतलाय का? तीन दिवस झाले, शेतातील पिके उद्ध्वस्त झालेले असताना अद्याप शासन-प्रशासन आणि विमा कंपनी शेतकर्यांच्या बांधावर पहायला मिळत नाहीत. त्यांचे नुकसानीचे पंचनामे होत नाहीत. उलट 2022 साठी विमा भरलेल्या शेतकर्यांना ऑनलाईन नुकसानीचे फोटो अपलोड करण्याबाबत सांगितले जाते. ते फोटो अपलोड करण्याची आजची शेवटची तारीख देण्यात आली आहे. आज दुपारी ही बातमी लिहिपर्यंत सर्वर डाऊन होतं. रिपोर्टरने याबाबत खात्री केली, एकीकडे शेतकर्यांचा कनवळा आणायचा आणि दुसरीकडे व्यवस्थेला बांधावर जाता येत नाही आणि ऑनलाईन अपलोड करण्याबाबत सर्वर बंद ठेवायचं, व्यवस्थेच्या या भूमिकेमुळे शेतकर्यांत संताप व्यक्त केला जात असून साल्यांना खेटराने मारलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकर्यांकडून व्यक्त होताना दिसून येत आहे. सर्वर डाऊन असल्याने शेतकर्यांना आजपावेत आपली नुकसानीची कथा विमा कंपनीकडे मांडता आली नाही. त्यामुळे विमा कंपनीसह प्रशासनाने थेट आता शेतकर्यांच्या बांधावर जावं, लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणार्यांनी या गंभीर बाबीची दखल घेत स्वत:हून बांधावर जात स्वत:च्या उपस्थितीत अधिकार्यांसमवेत पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.