गेवराई (रिपोर्टर) परतीच्या पावसाने गेवराई तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यात एकूण क्षेत्र 1 लाख 8 हजार 369 हेक्टरवर पेरणी झालेली आहे. यातील तब्बल 1 लाख 2 हजार हेक्टरवर क्षेत्र बाधीत झाले आहे. अजूनही पाऊस सुरूच असून त्यामुळे आणखी शेतकर्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मंडळाधिकारी आणि तलाठ्यांनी सज्जाच्या ठिकाणी आणि शेतकर्यांच्या बांधावर जावून नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ अहवाल द्यावा अशा सुचना गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांनी सर्व मंडळाधिकारी आणि तलाठ्यांनादिल्या आहेत.
परतीच्या पावसाचा मोठा फटका गेवराई तालुक्याला बसला आहे. सुरूवातीला चांगला पाऊस पडल्याने बळीराजाने महागमोलाच बी बियाणे खरेदी करून काळ्या आईची ओटी भरली. पिक डोलात आले असतानाच पावसाने दडी मारली. त्यामुळे काही शेतकर्यांनी दुबार पेरणी केली. दुबार पेरणी केलेले पिक जोमात आले होते. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिसकावून घेतला. गेल्या आठ दिवसात गेवराई तालुक्यात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. तालुक्यात 1 लाख 8 हजार 369 हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. यातील तब्बल 1 लाख 2 हजार हेक्टरमधील पिकात पाणी साचले आहे. त्यामुळे हे पिके बाधीत झाले आहेत. आणखी पाऊस सुरूच असल्याने शेतकर्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तलाठी, मंडळाधिकारी यांनी शेतकर्यांच्या बांधावर जावून नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ अहवाल द्यावा अशा सुचना गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांनी दिल्या आहेत.