बीड (रिपोर्टर) पोखरा योजनेअंतर्गत शेड मंजुर करण्यासाठी कृषी सहाय्यकाने शेतकर्याकडून प्रत्येकी 15 हजार रुपये घेतले. यातील काहींना शेडही मंजूर झाले नाही. यासह पोखरा योजनेत मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. याची चौकशीसाठी गेवराई तालुक्यातील आम्ला ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, येथील अनेक शेतकर्यांनी पोखरा योजनेअंतर्गत शेड उभारले आहेत. मात्र हे शेड मंजूर करण्यासाठी कृषी सहाय्यकांनी शेतकर्यांकडून 15 हजा रुपये घेतले आहेत. विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांची अडवणूक केली जात आहे. त्यामुळे कृषी सहाय्यकाची चौकशी करून त्यघांच्या पगारीतून शेतकर्यांचे पैसे परत करावेत, या मागणीसाठी गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायतसमोरच उपोषणाला बसले आहेत. या वेळी परमेश्वर डाके, नागेश मिठे, मोहन लांडे, रखमाजी खरात, भानुदास खरात, वचिष्ठ लांडे, भैय्या कदम, गंगाधर जाधव, गोरख लांडे, प्रल्हाद डाके, विकास मिठे, कालिदास मिसाळ, सचीन लांडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.