बीड (रिपोर्टर): गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची सातत्याने वाढ होत असल्याने गेल्या आठवड्यात आयूक्त सुनिल केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, एसपी, मुख्याधिकारी यांना कोरोनाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याची ऍडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाचा आणि जनतेचा बेजबाबदारपणा समोर आला होता. त्यानंतर बीड जिल्ह्यात कोरोना टेस्ट वाढवण्यात आल्या. मास्कबाबत सक्ती करण्यात आली. त्याचबरोबर कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली. संबंधीत खात्याच्या अधिकार्यांनी आपल्या कर्मचार्यांना तात्काळ लस देण्याच्या सूचना दिल्यानंतर आज लस घेण्यासाठी बीड जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आले. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागल्याने पुन्हा कोरोनाच्या लसीकडे लाभार्थ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
कोरोनावरची लस उपलब्ध झाल्यानंतर आरोग्य विभागासह अन्य खात्यातील कर्मचार्यांना सर्वप्रथम लस देण्याचे आयोजन करण्यात आले. सुरूवातीचे दोन दिवस लसीकरण मोहिम व्यवस्थित पार पडली, त्यानंतर लसीकरण मोहिमेकडे काहीसे दुर्लक्ष झाले. ज्या लोकांनी लस घेण्याबाबत अपडेट केले होते तेही याकडे दुर्लक्ष करत राहिले. विविध खात्याचे कर्मचारी लस घेण्याबाबत निरुत्साही दिसुन आले. मात्र त्याच कालावधीत महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या लक्षणीय वाढत असल्याचे दिसून येवू लागले. गेल्या आठ दिवसांपूर्वी आयूक्त सुनिल केंद्रेकरांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, एसपी, मुख्याधिकारी यांची बैठक घेवून कोरोनाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. काहींच्या कामावर नाराजी व्यक्त केली. कोरोना चाचण्या वाढवण्याबाबतही सूचित केले. त्यांची ती ऍडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कोरोनाबाबत जनतेबरोबर प्रशासकीय पातळीवरचा बेजबाबदारपणा उघड झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणासह सामाजिक डिस्टंन्स, तोंडाला मास्क लावणे हे पर्याय असल्याने आता पुन्हा कोरोनाविरूद्धची लढाई वेगाने लढण्यात येवू लागली. त्याचाच एक भाग कोरोना लसीकरणासाठी आज बीड जिल्हा रुग्णालयामध्ये विविध खात्याच्या कर्मचार्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. इथेही सोशल डिस्टंन्सचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर उपस्थित डॉक्टरांनी हात जोडून सोशल डिस्टंन्स पाळा, सुशिक्षित आहात असे म्हणत लसीकरणासाठी आलेल्या कर्मचार्यांचे कान टोचले. लसीकरणासाठी आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.