बीड (रिपोर्टर) पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्न आहार शाळेत शिजवून दिला जातो, मात्र आता बीड, अंबाजोगाई आणि माजलगाव या शहरात सेंट्रल किचन पद्धत राबविली जात आहे. यामुळे हजारो पोषण आहार महिला कामगार बेरोजगार झाल्या आहेत. त्यांचा रोजगार हे सरकार भांडवलदारांच्या घशात घालत आहे. त्यांचा रोजगार त्यांना पुन्हा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार मोठा लढा उभारणार असून त्यासाठी बीडमध्ये 20 व 21 ऑक्टोबर रोजी सिटूचे राज्य अधिवेशन होत आहे. यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर नागरगोजे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
शासकीय विश्रामगृह येथे आज पत्रकार परिषदेचेआयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर नागरगोजे हे बोलत होते. या वेळी डॉ. अशोक थोरात, मोहन जाधव यांचीही उपस्थिती होती. पुढे बोलताना नागरगोजे म्हणाले की, महाराष्ट्रात शालेय पोषण आहार कामगारांना केवळ 50 रुपये रोज आहे. तोही वेळेवर मिळत नाही. तामिळनाडुमध्ये याच कामासाठी कामगारांना 11 हजार रुपये महिना आहे. इतर राज्यातही चांगला रोजगार दिला जातो, मात्र महाराष्ट्रामध्ये केवळ 50 रुपये रोज या कामगारांना मिळते. सकघाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत हे कामगार मध्यान्न आहार करण्यासाठी झटतात. त्याचा मोबदला या कामगारांना तुटपुंज्या स्वरुपात मिळतो, तोही वेळेवर मिळत नाही. आतातर सेंट्रल किचन पद्धत राबविल्यामळे हजारो महिलांचा रोजगार भांडवलदारांच्या घशात जात आहे. या विरोधात कामगारांमध्ये शासनाप्रती प्रचंड रोष आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रभर तिव्र आंदोलन छेडणार आहोत, या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कामगारांचे राज्यस्तरीय दुसरे दोन दिवसीय अधिवेशन बीडमध्ये 20 आणि 21 ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यानिमित्त 20 ऑक्टोबर रोजी शहरात भव्य रॅली निघणार आहे. ही रॅली सकाळी 11 वा. जि.प.समोरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसस्थानक अण्णाभाऊ साठे चौक सुभाष रोड मार्गे जैन भवन येथे जाणार असून तेथे मेळावा होणार आहे. या मेळाव्याला सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी.एन. कराड, राज्य सरचिटणीस कॉ. एम.एच. शेख, हिमाचल प्रदेशचे कामगार नेते कॉ. जगत राम शुबा शमीम यांच्यासह आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.