बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने संततधार सुरुच ठेवल्याने जिल्ह्यातला शेतकरी उद्ध्वस्त झाला असून बीड जिल्ह्यातल्या तीन तालुक्यांसह जिल्हाभरात सुमारे पावणेदोन लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले. उघड्या डोळ्याने हाताशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्याचे पाहून शेतकरी शेतकरी धायमोकळू रडत असल्याचे ठिकठिकाणी दिसून येते. मात्र पालकमंत्री अतुल सावेंना अद्यापही पाझर फुटला नसल्याचे दिसून येत असून अतुल सावे यांनी जिल्हा दौरा करत शेतकर्यांच्या शेतातील उद्ध्वस्त झालेल्या पिकांची पाहणी अद्याप केली नाही. त्यामुळे सत्ताधार्यांसह पालकमंत्री सावेंविरोधात शेतकर्यात संताप व्यक्त केला जात असून बाप देता का बाप, आम्ही काय केलं पाप’ असा जाहीर सवाल जिल्ह्यातला शेतकरी राज्यकर्त्यांना विचारत आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाची संततधार सुरू आहे. या संततधारीमुळे सोयाबीन, कापूस या नगदी पिकांसह अन्य पिके उद्ध्वस्त झाले आहेत. प्राथमिक पाहणी केलेल्या स्थळ पाहणीनुसार जिल्हाभरातील दोन हेक्टर खालील 2 लाख 80 हजार 64 शेतकर्यांचे तर 3 हेक्टर खालील 5 हजार 260 असे एकूण 2 लाख 85 हजार 344 शेतकर्यांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल तयार केला. आजही पाऊस सुरु आहे. शेतामध्ये कापसाच्या वाती झाल्या. सोयाबीनला कोंब फुटले, अन्य पिके पाण्यात गेले. शेतकरी हवालदिल होऊन उभ्या पिकाकडे पाहत धायमोकळू रडत आहेत. शेतकरी अडचणीत असताना राज्यातलं शिंदे-फडणवीस सरकार या शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत आहे. अद्याप शेतकर्यांच्या नुकसीनाबाबत कुठलीही घोषणा राज्यकर्त्यांकडून करण्यात आली नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं सोडा बीड जिल्ह्यात आयात करण्यात आलेला पालकमंत्री यांनी सुद्धा बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेतात जावून कुठलीही पाहणी केली नाही. शेतकर्यांना कसलाही आधार दिला नाही. आर्थिक सोडा शाब्दीक आधार देण्याचे दायित्व पालकमंत्री अतुल सावेंनी दाखवले नाही. गेल्या सहा ते सात दिवसांच्या कालखंडात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. दोन ते तीन शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. मात्र बाप म्हणून मिरवणारे अतुल सावे यांना बीड जिल्ह्यातील शेतकर्यांाबाबत साधा पाझरही फुटला नाही. कुठे आहेत पालकमंत्री? आम्हाला कुणी वाली आहे का? बाप देता का बाप, आम्ही काय केले पाप? म्हणत शेतकरी राज्य सरकार आणि पालकमंत्री अतुल सावेंच्या दुर्लक्षीत भूमिकाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.