कोरोना वॉर्डात राऊंड, रुग्णांना योग्य वेळेत उपचार करण्याच्या डॉक्टर, कर्मचार्यांना सूचना, लसीकरणासाठी टोकन पद्धत, लक्षणे आढळले तर तात्काळ कोरोना चाचणी करण्याचे केले आवाहन
बीड (रिपोर्टर)- वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य व्यवस्था सतर्क झाली असून जिल्हा रुग्णालयाच्या कोविड वॉर्डात आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गिते यांनी राऊंड घेत कोरोना रुग्णांची तपासणी बरोबर व्यवस्थेची पाहणी केली. कोरोना रुग्णाला कुठलीही आरोग्य सेवा कमी पडता कामा नये अशा सक्त सूचना देत जिल्हावासियांना कोरोनाचे लक्षणे जाणवताच तात्काळ कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. लसीकरणा दरम्यान उडत असलेल्या गोंधळावर टोकन पद्धत यापुढे राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने काही ठिकाणी लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बीडमध्येही आठवडाभरात कोरोना रुग्ण वाढताना दिसून येत आहे. या अनुषंगाने आज सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डात प्रत्यक्ष जात रुग्णांची तपासणी केली. रुग्णांवर वेळेत औषधोपचार करण्याच्या सूचना उपस्थित डॉक्टर, कर्मचार्यांना दिल्या. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासन सतर्क असल्याचे सांगितले. सध्या बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव, आष्टी, बीड, आयटी बीड, स्वाराती येथे कोविड सेंटर सुरू असून गरज भासल्यास अन्य ठिकाणचे कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गरज भासल्यास
कर्मचार्यांची पुन्हा भरती
कोरोना सेंटर सुरू केल्यानंतर जिल्हाभरात कंत्राटी तत्वावर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर घेत होते, मात्र कोरोना कमी झाल्यानंतर त्यातील काही कर्मचार्यांची कपात करण्यात आली होती. आता पुन्हा गरज भासली तर कर्मचार्यांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांनी दिली.
डॉ. गित्ते ऍलर्ट, रुग्णालयाचा घेतला आढावा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.