आष्टी (रिपोर्टर) रिक्षामध्ये दूध घेऊन जाणार्या एका तरुणाला पाच जणांनी रस्त्यात अडवून मारहाण करत त्याच्या गळ्यातील सोन्याच्या लॉकेटसह खिशातील रोख रक्कम बळजबरीने काढून घेत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील बावी शिवारात घडली. या प्रकरणी काल आष्टी पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश महादेव कराळे (रा. कडा ता. आष्टी) यांचा दुधाचा व्यवसाय आहे. ते नेहमीप्रमाणे डोईठाणा येथून रिक्षामध्ये दूध घेऊन बावीमार्गे आष्टीकडे येत असताना रस्त्यात थांबलेल्या इसमाला त्यांनी हॉर्न वाजवून बाजुला होण्याचा इशारा केला. या वेळी गणेश सुभाष गोल्हार, राजेंद्र वैजिनाथ सांगळे, भरत रावसाहेब गोल्हार, बाबूराव रावसाहेब गोल्हार, सुदर्शन सुभाष गोल्हार (सर्व रा. बावी ता. आष्टी) यांनी महेश महादेव कराळे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गज व लाकडी काठीने मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील सव्वा दोन तोळ्याची सोन्याची साखळी आणि खिशातील ५ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. या प्रकरणी कराळे यांनी आष्टी पोलिसात तक्रार दिली असून वरील पाच जणांविरोधात कलम ३०७, ३२७, ३२६, ३२४, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डीवायएसपी धाराशिवकर हे करत आहेत.