बीड (रिपोर्टर) दोन दिवसापूर्वी राज्याचे आरोग्यआयुक्त तुकाराम मुंढे बीड येथे आले होते. त्यांनी जिल्हा रूग्णालयात येवून तेथील परिस्थितीची पाहणी करत काही सुचना केल्या होत्या. त्यानुसार आज सकाळी जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात आडवे तिडवे वाहने लावल्याचे निदर्शनास आल्यानंतर डॉ.सुरेश साबळे यांनी स्वत: गाड्याची हवा सोडून दिली व यापुढे व्यवस्थीत गाड्या लावण्याचे निर्देश संबंधीत वाहन चालकांना दिले.
जिल्हा रूग्णालयाच्या आवारामध्ये आणि परिसरात आडवे तिडवे वाहने लावले जात असल्याने यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होतो. सदरील वाहनधारकांना कित्येकवेळा सांगूनही ते ऐकत नाहीत. आज सकाळी स्वत: जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी व्यवस्थीत वाहने न लावणार्या गाड्यांची हवा सोडली. यामुळे वाहनधारकात एकच पळापळ सुरू झाली होती. जिल्हा रूग्णालयाच्या आवारात सेक्युरिटी असतानाही काही वाहनधारक त्यांचे न ऐकता आपला मनमानीपणा करत कोठेही गाड्या उभ्या करत असतात. आडव्या तिडव्या गाड्या उभ्या केल्याने रूग्णासह त्यांच्या नातेवाईकांना त्रास तर होतच आहे. पण यामुळे अॅम्ब्युलन्ससह इतर येणार्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. सीव्हील सर्जन यांनी गाड्यांची हवा सोडल्यामुळे आतातरी वाहनधारकांना शिस्त लागेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.