बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामधून दरवर्षी चार लाखापेक्षा जास्त ऊसतोड मजूर महाराष्ट्रासह इतर राज्यात ऊसतोडणीसाठी जात असतात. यावर्षी परतीचा पाऊस लवकर उघडला नसल्याने मजुरांना दसर्याला आणि दिवाळीला ऊसाच्या फडात जाता आले नाही. दिवाळी होताच ऊसतोड मजूर आपले बिर्हाड घेवून कारखान्याकडे निघाले आहेत. दरवर्षी मजूरांच्या मुलांसाठी हंगामी वस्तीगृह सुरू केले जात असले तरी या वस्तीगृहात सर्वच मजुरांची मुले राहत नाहीत. त्यामुळे अनेक मुले यावर्षीही शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.
बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात चार लाखापेक्षा जास्त ऊसतोड मजूर आहे. दसरा झाला की मजूरांना कारखान्याचे वेध लागतात. यावर्षी मात्र कारखान्याला जाण्यास थोडा उशिर झाला. 15 ऑक्टोबरपासून कारखाने सुरू होणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी परतीच्या पावसामुळे कारखाने सुरू करता आले नाही. पाऊस उघडताच ऊसतोड मजूर आपल्या कारखान्याकडे रवाना झाले. काही मजूर दिवाळीपूर्वी कारखान्याला गेले तर काही मजूर दिवाळीनंतर आता कारखान्याकडे निघू लागले. दररोज जिल्हाभरातून शेकडो ट्रॅक्टर, ट्रकद्वारे ऊसतोड मजूर कारखान्याकडे रवाना होत असताना दिसून येत आहेत. ऊसतोड मजुरांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये, तयांचे नुकसान होवू नये यासाठी दरवर्षी गावपातळीवर हंगामी वस्तीगृह सुरू केले जातात. मात्र तरीही कित्येक मुले आपल्या आई वडिलांसोबत ऊसाच्या फडात दिसून येतात. यावर्षी कित्येक मुले आपल्या आईवडिलांसोबत ऊसतोडणीसाठी गेले आहेत. मुले ऊसतोडणीला गेल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.