बीड । रिपोर्टर
बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात राजरोजपणे सुरु आहेत. हे स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस अधिक्षक यांच्या विशेष पथकांनी टाकलेल्या धाडीतून वेळोवेळी सिध्द होत आहे. जे विशेष पथकांना दिसत ते स्थानिक पोलिसांना कस दिसत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. रात्री स्थानिक गुन्हे शाखेने बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेला बनावट देशी दारुचा कारखाना उद्घ्वस्त केला. यावेळी लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सोलापूर- धुळे रोड बीड बायपास लगत शिदोड शिवारात एका पत्र्याचे शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी दारु रसायनचा वापर करुन बनावट देशी दारु तयार करुन देशी दारुचे बॉटलमध्ये भरुन त्याची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक सतिष वाघ यांना मिळाली होती. त्यावरुन त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक कुकलारे, पोलिस उपनिरिक्षक भगतसिंग दुल्लत, पो.हे.कॉ. मनोज वाघ, रामदास तांदळे, देविदास जमदाडे, पो.ना. प्रकाश कदम, कैलास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पो. कॉ. नारायन कोरडे, अशोक कदम यांचे पथक तयार करुन रात्री साडे आकरच्या दरम्यान सापळा रचून छापा मारला असता सोनाजी अशोक जाधव (वय 28 वर्षे रा.गांधीनगर, पेठ बीड) हा एका पत्र्याचे शेडमध्ये आरोग्यास हानीकारक रसायनाचा वापर करुन बनावट देशी दारु तयार करुन ती देशी दारुच्या बॉटलमध्ये भरुन ओरिजनल आहे असे भासवून विक्री करत होता. पोलिसांनी छापा टाकला यावेळी देशी दारुचे साहित्य व बनावट तयार देशी दारु असा एकूण 2,94,520 /- रु.चा माल मिळून आला. तो जप्त करुन आरोपी विरुध्द बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 341/2022 कलम 328 भादंवि सह कलम महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे सुधारीत 2018 चे कलम 12,13,65(अ),(ब),(क),(ड),(ई),(फ), 80 व 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार, पोलिस उपअधिक्षक संतोष वाळके, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय सतिष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने केली.
विशेष पथकांना दिसत ते बीड ग्रामीण पोलिसांना का दिसत नाही?
बीड जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती घेवून केसेस करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी दिल्या आहेत. कारवाई न करणार्या 18 पोलिस ठाण्यांना त्यांनी नोटीसाही काढल्या आहेत. तरी देखील अनेक ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु आहेत. बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत चक्क आरोग्यास हानीकारक रसायनाचा वापर करुन बनावट देशी दारु तयार करणारा दारुचा कारखाना राजरोजपणे सुरु असतांना याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना कशी कळत नाही हे मात्र विषेशच. त्यांच्या हद्दीत विषेश पथके अवैध धंद्यावर धाडी टाकून कारवाई करतात मात्र त्यांना ते कसे दिसत नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
म्हणून अपघाताचे प्रमाण वाढले
बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बीड बायपासवरील दोन्ही चौक, मंजेरी फाटा, मांजरसुंबा घाट सह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे या ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेले अवैध धंदे आहेत. या ठाण्याच्या हद्दीत थेट बनावट दारुचे अड्डे असल्याने लोकांना ती सहज मिळते, मटका, गुटका, सट्टा यासारख्या धंद्यामुळे वादाचे प्रमाणही वाढले असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. याकडे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी विषेश लक्ष देण्याची मागणी होत आहे.