बीड (रिपोर्टर) मी आत्महत्या करत आहे असे नातेवाईकांना व्हॉटसअॅपवर सांगून विषाची बाटली घेवून घराबाहेर पडलेल्या एका तरूणीचे शिवाजीनगर पोलिसांनी रात्री तब्बल साठ ते सत्तर किमीचा प्रवास करून तिचे लोकेशन काढत तिला ताब्यात घेवून तिची समजूत काढली. शिवाजीनगर पोलिसांनी रात्री दाखवलेल्या तत्परतेमुळे एका तरूणीसह तिच्या पोटात असलेल्या बाळाचे प्राण वाचवल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बीड येथील एका तरूणीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्यातून ती आठ महिन्याची गरोदर आहे. मात्र रात्री झालेल्या वादानंतर ती मुलाच्या दारात विष पिणार असल्याचे घरच्यांना सांगून घराबाहेर पडली होती. मात्र ती कुठे जावून विष घेणार? याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक केतन राठोड यांनी तपासाची सुत्रे गतीमान करत सायबर सेलला माहिती देवून पोलिस नाईक फेरोज पठाण, म.पो.वैशाली राख, शेख लाल या तिघांचे पथक तयार करून मुलीच्या आईसह मैत्रीणीला सोबत घेवून मुलीच्या लोकेशनवर प्रवास सुरू केला. पहिले लोकेशन नेकनूरला निघाले. त्यानंतर तिथे शोध घेतला मात्र पुढे ते लोकेशन नेकनूर केज दरम्यन निघाले. पोलिसांनी पुन्हा मोर्चा तिकडे वळवला. त्यावेळी केज पोलिसांना याची माहिती देवून त्यांचीही मदत घेतली. रात्री 12 च्या दरम्यान त्या मुलीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी तिला केज पोलिस ठाण्यात नेवून तिची समजूत काढली. पोलिसांच्या तत्परतेमुळे सदरील मुलीचे प्राण वाचले.
एसपींकडून अभिनंदन, कर्मचार्यांना रिवॉर्ड
शिवाजीनगर पोलिसांनी रात्री अभिनंदनीय कारवाई केली आहे. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तरूणीचे प्राण वाचले. याबद्दल जिल्हा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शिवाजीनगर पोलिसांचे अभिनंदन करत कारवाईत सहभागी असलेल्या कर्मचार्यांचे रिवार्ड घोषीत केला.