गेवराई (रिपोर्टर) उत्तरप्रदेश राज्यातील सारंगपूर येथून कर्नाटक राज्यातील विजापूरकडे जाणारा मालवाहू ट्रक अडवून चोरट्यांनी चालकाला मारहाण करत लुटल्याची घटना आज पहाटे 3 च्या दरम्यान पाडळशिंगी जवळ घडली. दरम्यान गेवराई पोलिसांना आव्हान देत चोरट्यांनी पुन्हा सलामी दिली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, उत्तरप्रदेश मधील सारंगपुर येथून चालक सिताराम मेना (वय 30) व किन्नर सुरेश मेना (वय 24) हे दोघे आर.जे.14 जी.सी 4536 या ट्रकने माल वाहून कर्नाटक राज्यातील विजापूर येथे निघाले असता ते आज शनिवार दि.5 रोजी पहाटे 3 च्या सुमारास गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी या ठिकाणी आले असता अज्ञात चार चोरट्यांनी त्यांची गाडी अडवत काच फोडून चाकुचा धाक दाखवत त्यांच्या जवळील 11 हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल व गाडीतील 50 ते 60 लिटर डिझेल लंपास करत गाडीचे मोठे नुकसान केले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच डि.बी. पथकाचे प्रमुख प्रफुल्ल साबळे, विठ्ठल राठोड यांनी घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गेवराई पोलीस ठाण्याअंतर्गत चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आसताना या चोरट्यांना जेरबंद करण्यात गेवराई पोलीस अपयशी ठरत असल्याने या घटनेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.