बीड (रिपोर्टर) महावितरणकडून ग्राहकांना अनेक वेळा बिलाचा शॉक दिला जातो. शहरासह ग्रामीण भागात रिडिंग न घेताच अंदाजे बील दिला जातो. तालुक्यातील खंडाळा येथील हनुमान नगर भागात राहणार्या नागरिकांना एका महिन्याचे बील तब्बल 5320 रुपये आला असल्याने ते बील कसं भरावं ? असा प्रश्न त्या भूमिहिन मजुरापुढे पडला आहे.
महावितरणचे कर्मचारी कधीच रिडिंग घेण्यासाठी ग्रामीण भागात जात नाहीत. बसल्या बसल्या मनाला वाटेल ती रिडिंग टाकून मोकळे होतात. त्यामुळे याचा त्रास वीज ग्राहकांना सहन करावा लागतो. अनेकदा अव्वाची सव्वा रिडिंग टाकून हे कर्मचारी मोकळे होतात. ऐन दिवाळीत बील भरा नसता वीज खंडीत करू, असा इशारा महावितरणने दिला होता. अनेक ग्राहकांनी अव्वाचे सव्वा आलेले बील भरले. तालुक्यातील मौजे खंडाळा येथील हनुमान नगर भागात राहणार्या एकूण 20 ग्राहकांना अव्वाचे सव्वा वीज बील आले आहे. यामध्ये अप्पा बन्सी पवार यांचे मिटर गेल्या सात महिन्यांपूर्वीच जळालेले आहे. ते दरमहा अंदाजे 400 रुपयांच्या आसपास नियमित वीज बील भरत होते. परंतु या महिन्यात त्यांना तब्बल 5 हजार 320 रुपयांचे वीज बील आल्याने ते गोंधळून गेले. याबाबत त्यांनी महावितरणच्या अधिकार्यांकडे तक्रार केली असता तुम्हाला ते वीज बील भरावेच लागेल, असे सांगितले. याचप्रमाणे तुळशीराम बरडे यांना तीन महिन्याचे 17 हजार रुपये तर पिंटू गोवर्धन पवार यांना 1 हजार 830 रुपये, बन्सी नाना पवार यांना एका महिन्याचे 1 हजार 310 रुपये असा अव्वाचे सव्वा वीज बील देण्यात आले आहे. तुम्ही तात्काळ वीज बील भरा अन्यथा तुमचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येईल, असे महावितरणकडून सांगण्यात येते.