बीड (रिपोर्टर) जिल्हा रुग्णालयामध्ये गुटखा, तंबाखू खाऊन अनेक जण कुठेही पिचकार्या मारून रुग्णालयाचा परिसर अस्वच्छ करीत आहेत. यावर उपाय म्हणून तंबाखू, गुटका बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला. गेल्या दोन महिन्यात सिव्हील सर्जन डॉ. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 84 जणांवर कारवाई करून 7 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शासकीय कार्यालयामध्ये गुटखा, तंबाखू खाण्यास बंद असतानाही अनेक जण नियमांचे उल्लंघन करतात. नियम न पाळणार्यांना दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील अनेक कोपरे गुटखा, तंबाखुने रंगलेले आहेत. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. साबळे यांनी याबाबत ठोस भूमिका घेत तंबाखू बाळगणार्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. दोन महिन्यात 84 लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून सात हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान आज जिल्हा रुग्णालयामध्ये तंबाखूजन्य पदार्थाची प्रतिकात्मक होळी करून तंबाखू विरोधी शपथ देण्यात आली. या वेळी डॉ. साबळे, डॉ. संतोष शहाणे, अशोक मते, नवनाथ भडगुंबे, सुरेश दामोधर, अंबादास जाधव, ऋषीकेश शेळकेंसह आदींची उपस्थिती होती.