ऑनलाईन रिपोर्टर
राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज उभारलं जाईल, अशी घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. साम टीव्हीच्या सामर्थ्य महाराष्ट्राचे वेध भविष्याचा मंथन विकासाचे या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. कोरोना काळात आपल्याला आलेल्या अनुभवानंतर आपण हा निर्णय घेत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे.
साम टीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारलं जाणार आहे. कोरोना काळात आपल्याला अनुभव आला होता की, डॉक्टरांची संख्या कमी होती. त्यामुळे आपण हा निर्णय घेतला आहे.” सरकारकडून काही चुकलं तर माध्यमांना सांगण्याचा अधिकार आहे, पण सरकारने चांगलं काम केलं तर तेही आपण सांगणं गरजेचं आहे, असंही म्हणाले आहेत.
माध्यम समुहाविषयी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “समूहाला आम्ही आपलं मानतो. तुम्ही आम्हाला कधीही सूचना करू शकता. फक्त बातम्या देण्यापुरते नाही, तर मी आणि देवेंद्रजी आम्ही विकासाचं ध्येय घेऊन पुढे जात आहोत. सरकार विकासाची जपणूक करण्यासाठी असावं. आम्हाला येऊन तीन चार महिने झालेत तरी लोकांना बदल जाणवतोय की हे सरकार लोकांसाठी काम करणारं आहे.” आपलं काम २४ तास सुरू असतं, महाराष्ट्र आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.