गेवराई (रिपोर्टर) शहरातील शास्त्री चौकात असलेल्या अतिक्रमणधारकांच्या 33 दुकाना नगर परिषदेने मंगळवारी भल्या पहाटे साडेपाच्या सुमारास पूर्णत: जमीनदोस्त करत धडक कारवाई केली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी नियोजन करून सदरील अतिक्रमण काढून टाकताना पोलिसांचा प्रचंड फोजफाटा, दंगल पथकाला सोबत घेऊन या कारवाईला सुरुवात केली. शहरातील शास्त्री चौक ते छत्रपती शिवाजीमहाराज चौकात गेल्या अनेक वर्षांपासून 33 दुकानाचे अतिक्रमण होते. ज्यामुळे शहरातील रहदारीला मोठी अडचण होत होती. मात्र सर्व अतिक्रमण धारकांना या आधी सन 2020 साली जिल्हाधिकारी, बीड यांनी एक नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याची सूचना केली होती. वेळोवेळी सूचना, नोटीस देऊन ही अतिक्रमण धारक जुमानत नव्हते. या संदर्भात कोर्ट-कचेरी झाली. परंतू, कोर्टाकडून कसलाही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे, न.प.चे मुख्याधिकारी भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या आदेशाने दि. 11.11. 2022 रोजी सर्व अतिक्रमण धारकांना शेवटची नोटीस देऊन दि. 14.11. 2022 पर्यंत सर्व अतिक्रमण काढून घ्या, नसता दि. 15 नोव्हेंबर 2022 रोजी शास्त्री चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंतचे सर्व अतिक्रमणे कोणत्याही कारणाशिवाय तात्काळ काढून घेण्यात येतील आशा नोटिसा दिल्या होत्या. या शेवटच्या नोटीस नंतर 33 अतिक्रमण धारकांनी लगबग करून, सदरील प्रकरणात स्टे आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना कसलाही दिलासा मिळाला नसल्याने काहींनी आपले समान बाहेर काढले व काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र न.प.च्या वतीने आज मंगळवार रोजी भल्या पहाटे नगर परिषद प्रशासन व डिवायएसपी स्वप्नील राठोड यांच्या नेतृत्वाखाली आलेला प्रचंड पोलीस फौजफाटा, चार जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने, कडेकोट बंदोबस्त करून सर्व दुकाना जमीनदोस्त करून पाडून टाकण्यात आल्याची धडक कारवाई करण्यात आली. दरम्यान ही कारवाई सुरू असताना चौकात येणाऱ्या सर्व वाटा पोलीसांनी रोखून धरल्या होत्या. कुणालाही येऊ दिले गेले नाही. ज्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला अशा काही लोकांना पोलिसांनी बाजूला केले. यामध्ये काही व्यवसायिकांचे नुकसानही झाल्याचे आढळून आले. तर या कारवाईनंतर शहरातील शास्त्री चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.