गेवराई (रिपोर्टर) जातेगाव खोपटी तांडा येथील मजूर एका पकअपमध्ये बसून चारा आणण्यासाठी किट्टीआडगाव येथे जात असताना रोहितळजवळ कॅनॉल रोडवर पिकअपला विजेच्या तारेचा धक्का लागला. त्यामुळे पिकअपमध्ये शॉक लागून पिकअपने आग धरली. यात 65 वर्षीय आलुहरसिंग पवार जखमी होऊन मृत्यूमुखी पडले तर अन्य चार जण जखमी झाले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरची घटना ही काल रात्री घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जातेगाव खोपटीतांडा येथील पाच ते सहा मजूर एका पिकअपमध्ये बसून जनावरांना चारा आणण्यासाठी किटटीआडगावकडे निघाले होते. हा पिकअप ज्या ठिकाणी ऊसतोड आहे त्याठिकाणाहून उसाचे वाडे आणत असे. काल सायंकाळच्या दरम्यान सदरचे पिकअप हे उसाचे वाडे आणण्यासाठी निघाले होते. हे पिकअप जेव्हा रोहितळ जवळील कॅनॉल रोडने जात होते तेव्हा रस्त्यावरून विजेची तार गेलेली आहे. ती तार पिकअपला चिकटली. त्यामुळे पिकअपमध्ये विद्युतप्रवाह आला. त्याच वेळी स्पार्किंग होऊन पिकअपने पेट घेतला. घटनेचे गांभीर्य आणि शॉक लागल्यामुळे पिकअपमधील काही जणांनी उड्या घेतल्या. मात्र 65 वर्षीय आलीहरसिंग यांना पिकअपमधून बाहेर पडता आले नाही. त्यात ते गंभीररित्या भाजले गेल्याचे सांगण्यात येते. जखमींना तात्काळ गेवराई उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने यात आलुहरसिंग पवार यांचा मृत्यू झाला तर अन्य चार जणांवर अन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.