बीड (रिपोर्टर) औरंगाबाद विभागाचे महसूल उपायुक्त पराग सोमण हे जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून ते जिल्हाधिकार्यांच्या खर्चाचे ऑडीट रिपोर्ट (अभिलेखे), प्राप्त झालेला निधी, शासनाला पाठविण्यात आलेला अहवाल, शासनाकडून जिल्हाधिकार्यांना झालेला पत्रव्यवहार, त्याची अंमलबजावणी आणि सातबारा संगणकीकरण याबाबतची तपासणी करणार आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभाग आणि तहसीलदार हे युद्धपातळीवर आपले रेकॉर्ड अद्यावत करण्याची तयारी करत आहेत.
वर्षातून एकदा महसूल उपायुक्तांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी होत असते. या तपासणीमध्ये राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला विविध स्वरुपात प्राप्त झालेला निधी आणि खर्च आणि या खर्चाचे लेखापरिक्षण याची तपासणी केली जाते. लेखापरिक्षण करताना काही ऑडीट पॅरे आहेत का, त्याची पुर्तता झाली आहे का याची विशेष तपासणी केली जाते. सोबतच सातबारा संगणकीकरण हा विद्यमान महसूल विभागाचा अजेंड्यावरचा विषय आहे. त्याच्या कार्याबाबतही सोमण यांच्याकडून तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या दहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांची बैठक घेऊन आपले रेकॉर्ड अद्यावत करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे महसूल विभाग आणी तहसीलदार यांनी सोमण यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर रेकॉर्ड अद्यावत करण्याचे काम केले आहे. कदाचित सोमण यांच्या सोबत विभागीय आयुक्त केंद्रेकरही येण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने महसूल विभागाने आपली तयारी केली आहे.