आपआपल्या पॅनलचे उमेदवार ठरले, बैठकांवर जोर, बीडमध्ये दोन्ही क्षीरसागर सक्रिय, गेवराईत पंडितांसह लक्ष्मण पवारही मैदानात, आष्टी/पाटोदा/शिरूर धसांनी घातलं लक्ष, आजबे-धोंडेंचीही काही ग्रामपंचायतींवर पकड, परळी/अंबाजोगाईत मुंडे भाऊ-बहिणीचं लक्ष, माजलगाव, धारूर, वडवणीत सोळंके, आडसकर, आंधळे, जगतापांचे गावागावात दौरे
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातल्या 704 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत असून जिल्ह्यातल्या अडीच हजार ते साडेपाच हजार मतदान असलेल्या अनेक ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी या निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जशी जशी जवळ येत आहे तसे मातब्बर नेते गावागावांतल्या लोकांच्या बैठकी घेऊन आपआपले पॅनलच्या उमेदवारी यादीला अंतम स्वरुप देत आहेत. बीड तालुक्यात दोन्ही क्षीरसागर या निवडणुकीमध्ये सक्रिय झाले असून दोघांकडूनही बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. गेवराईमध्ये पंडितांसह आ. लक्ष्मण पवार मैदानात उतरल्याचे चित्र आहे तर आष्टी-पाटोदा-शिरूर तालुक्यात धस-धोंडे-आजबे हे निवडणुकांकडे लक्ष ठेवून आहेत. परळी-अंबाजोगाईत मुंडे भाऊ-बहिणींनी खासकरून लक्ष घातल्याचे दिसून येत आहे तर माजलगाव-धारूर-वडवणी तालुक्यात स्थानिक नेत्यांसह विधानसभा लढवणारे नेते सक्रिय झाल्याचे पहावयास मिळत आहे त्यामुळे या निवडणुकांना अधिक रंग चढताना दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सहा विधानसभा मतदारसंघातल्या विद्यमान आमदारांसह पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवणार्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणूक महत्वाची मानत आपआपल्या मतदरासंघातल्या मोठ्या ग्रामपंचायतींसह छोट्या ग्रामपंचायतींकडे आपलं लक्ष वळवलं आहे. जिल्ह्यात एकूण 704 ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. यामध्ये बीड 132, अंबाजोगाई 83, आष्टी 109, धारूर 31, गेवराई 76, केज 66, माजलगाव 44, परळी 80, पाटोदा 34, शिरूर 24 आणि वडवणी तालुक्यात 25 प्रमाणे गावांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. बीड तालुक्यात जयदत्त क्षीरसागर सक्रिय झाल्याचे दिसून येत असून त्यांनी अनेक गावच्या ग्रामपंचायतींमध्ये लक्ष घातले आहे. त्यासाठी बैठकाही घेतल्या आहेत. तर विद्यमान आमदार संदीप क्षीरसागरांनी बैठकांवर जोर देत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना आव्हान देण्यासाठी आपले पॅनल उभे करताना दिसून येत आहेत. गेवराईत अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांच्यासह बदामराव पंडित विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हेही ग्रा.पं. निवडणुकीत सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणच्या गावांमध्ये बैठका घेत सदरची ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात यावी यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. तिकडे आष्टी-पाटोदा-शिरूरमध्ये धसांनी व्यूहरचना आखत जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्याच ताब्यात आणि नेतृत्वात कशा निवडून येतील याकडे लक्ष घातले आहे तर आजबे-धोंडेही ग्रा.पं.निवडणुकीसाठी आपआपल्या कार्यकर्त्यांना बळ देत आहेत. परळी -अंबाजोगाई-केजमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे हे पक्ष पातळीवर आपआपले उमेदवार देऊन आपल्या गटाचाच सरपंच व्हावा यासाठी प्रयत्नशील दिसून येत आहेत. माजलगाव, वडवणी, धारूर या तीन तालुक्यात विद्यमान आमदारांसह स्थानिक नेते गावागावांत बैठका घेताना दिसून येत आहेत. 28 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. त्याअनुषंगाने मातब्बर नेत्यांचे पॅनल आणि त्यातील उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरुप आले आहे. पुढील पंधरा दिवस जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकींचे घमासान पहावयास मिळणार आहे.