किल्ले धारूर (रिपोर्टर)- धारुर तालुक्यातील धुनकवाड येथे शेतात विहिर घेताना झालेल्या जिलेटिन कांडीच्या स्फोटात चार जण जखमी झाल्याची घटना सकाळी आठच्या सुमारास घडली.
धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोचार करुन जखमींना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून दोन गंभीर जखमी आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, धारुर तालुक्यातील धुनकवाड येथील सुर्यनारायण यादव यांच्या शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु आहे. आज सकाळी सात ते आठच्या सुमारास विहिरीत काम करत असताना जिलेटनच्या कांडीचा अचानक स्फोट झाला. अंदाज न आल्याने यात चार जण जखमी झाले आहेत. डोळ्यात धूळ माती गेली तसेच अंगावरती दगडे पडल्याने यात दोघांना गंभीर जखमा झाल्या आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयात जखमीवर डॉ. चेतन आदमाने, डॉ. परवेज शेख यांच्यासह आरोग्य कर्मचार्यांनी प्राथमिक उपचार केले. जखमीना लातूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमीत जमीन मालक भागवत यादव (२५) रा.धुनकवाड यांच्यासह नागनाथ बालासाहेब तोंडे (२७), आशोक लक्ष्मण तोंडे (२०), बाबुराव राजेभाऊ तोंडे (२५) रा. सर्व देव दहिफळ यांचा समावेश आहे.