नेकनूर (रिपोर्टर) बांधाच्या किरकोळ वादातून मुळुकवाडी येथे रक्तपात झाल्याची घटना काल नेकनूरजवळील मुळुकवाडी येथे घडली. या प्रकरणी नेकनूर पोलिसात बाप-लेकासह आईवर गुन्हा दाखल झाला असून तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मुळुकवाडी येथील निर्मळ कुटुंबियात गेल्या काही वर्षांपासून जमीनीचा वाद सुरू होता. हा वाद काल एवढा विकोपाला गेला की पुतण्याने चुलत्याला कोयत्याने सपासप वार करून तोडले. त्यानंतर चुलतीवरही कोयत्याने वार केले. मदतीची याचना मागणार्या चुलत्याला सोडवण्यासाठी आलेल्या चुलत भावासह भावजईवरही आरोपी रोहिदास विठ्ठल निर्मळ याने वार केले. या घटनेत चुलते बळीराम निर्मळ हे जागीच ठार झाले होते तर त्यांच्या पत्नी या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबादला पाठविण्यात आले होते. काल पोलिसांनी आरोपी रोहिदास निर्मळ याच्या नेकनूरमधून मुसक्या बांधल्या. त्यानंतर त्याची आई कोसाबाई विठ्ठल निर्मळ (वय 70), वडिल विठ्ठल पिराजी निर्मळ या दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्या विरोधात नेकनूर पोलिसात कांताबाई हिराजी निर्मळ यांच्या फिर्यादीवरून कलम 302, 307, 326, 324, 109, 515 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्ररणाचा पुढील तपास ठाणेप्रमुख मुस्तफा शेख हे करत आहेत.