माजलगाव (रिपोर्टर) तालुक्यातील शिंपेटाकळी (सिद्धेश्वर नगर) येथील शेतकरी उतरेश्वर गवते यांच्या दोन खिलार बैलांना गेल्या अनेक दिवसांपासून लंपी आजाराची लागण झाली होती. पशू वैद्यकीय उपचाराअभावी त्यातील एका बैलाचा आज (शुक्रवार) मृत्यू झाला, तर दुसर्या बैलासही वेळेवर उपचार न मिळाल्यास दगावण्याची भिती निर्माण झाली आहे.
कोरोना माहामारीनंतर आलेल्या लंपी स्कीन आजाराने जनावरांना ग्रासले. सुरुवातीच्या काळात जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगत पशू आरोग्य विभागास दक्ष राहण्यास सांगितले. काही दिवसानंतर माजलगाव तालुक्यात या आजाराचे प्रमाण वाढत गेले. शिंपेटाकळी (सिद्धेश्वर नगर) येथील उतरेश्वर गवते यांची दोन खिलार बैले शेतीतील मशागतीसह सध्या जयमहेश शुगर फक्टरीवर ऊस वाहातुकीचे काम करत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी यांच्या दोन्ही बैलांना लंपी आजाराने ग्रासले.
मात्र वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने व पशू आरोग्य विभागाच्या अनास्थेपणामुळे त्यांच्या दोन बैलापैकी एक बैलाचा आज (शुक्रवार) मृत्यू झाला, तर दुसरा बैलही खूप आजारी आसल्याने त्यास वेळीच उपचार न मिळाल्यास तोही दगावण्याची भिती निर्माण झाली आहे.