गेवराई (रिपोर्टर) तहसिल प्रशासनाने गेवराईतील वाळू माफियांवर कारवाई करून केण्या, ट्रॅक्टर जप्त केल्या होत्या. जप्त केलेले केण्या आणि ट्रॅक्टर गेवराईत आगारात लावण्यात आले होते. वाळूमाफियांनी ते 30 नोव्हेंबरच्या पहाटे तेथील सुरक्षारक्षकाला दमदाटी करून पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी गेवराई पोलिसात अज्ञात माफियांविरोधात गुन्हाही दाखल झाला. ट्रॅक्टर पळवणारे वाळूमाफिया सिसिटीव्ही फुटेजमध्ये कैद आहे. मात्र तरीदेखील तपास लागत नसल्याने वाळूमाफिया आणि गेवराई पोलिसांची मिलीभगत आहे. हप्तेखोर पेालिसांनीच हे ट्रॅक्टर पळायला लावले आहेत अशी उलटसुलट चर्चा आहे.
गेवराईत भरदिवसा सर्रासपणे वाळूउपसा होत आहे. याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करते. तहसिल प्रशासनाने गेल्या चार पाच दिवसात वाळूमाफियांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करून शहरातील बसस्थानकात ट्रॅक्टर आणि केन्या लावल्या होत्या. यातील सहा ट्रॅक्टर 30 नोव्हेंबरच्या पहाटे स्कॉर्पिओमधून आलेल्या वाळूमाफियांनी सुरक्षारक्षकाला दमदाटी करून पळवल्याची घटना घडली होती. याप्रकरणी 1 डिसेंबर रोजी सुरक्षारक्षक सखाराम किसन नागरे यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिसात अज्ञात सहा इसमांसह एका स्कॉर्पिओचालकाविरोधात कलम 395, 353 नुसार गुन्हाही दाखल आहे. मात्र याला तीन दिवस उलटूनही चोरीला गेलेले ट्रॅक्टरचा तपास लागत नाही. त्यामुळे वाळूमाफिया आणि गेवराई पोलिस यांची मिलीभगत आहे? गेवराई पोलिसांनीच वाळूमफियांना ते ट्रॅक्टर पळविण्यास मदत केली? अशी उलटसुलट चर्चा गेवराई शहरात होत आहे.