रुग्णालयात खळबळ
निर्दयी मातेचा शोध सुरू
अंबाजोगाई (रिपोर्टर) स्त्रीभ्रूण हत्येने काळवंडलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातल्या बाथरुममधील पाण्याने भरलेल्या बकेटमध्ये दोन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. स्वारातीमध्येच अर्भक आढळून आल्याने उलटसुलट चर्चेला उधान आले असून पाण्याने भरलेल्या बकेटीत निर्दयी मातेने अर्भक टाकल्यामुळे त्याचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला असावा, असा कयास काढला जात आहे.
येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या अपघात विभागातील वार्ड क्र. 35 मधील शौचालयाची आज सकाळी नऊ वाजता कर्मचारी साफसफाई करत असताना पाण्याने भरलेल्या एका बकेयमध्ये स्त्री जातीचे अर्भक असल्याचे कर्मचार्याच्या निदर्शनास येताच खळबळ उडाली. याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, अधिक्षक डॉ. राजेश जाधव, प्रमोद दोडे यांना कर्मचार्यांनी दिल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली असून सीसीटीव्ही तपासण्याचे काम दुपारी सुरू होते. रात्री अज्ञात महिलेने ते अर्भक बाथरुममधील बकेटमध्ये टाकले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्वाराती रुग्णालयाच्या अपघात विभागात रुग्णांसह नातेवाईकांची मोठी गर्दी असते. याचाच फायदा घेऊन हे अर्भक कोणीतरी टाकले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने स्वाराती रुग्णालयासह अंबाजोगाईत खळबल उडाली आहे.