4 हजार घरकुल मंजूरीच्या प्रतिक्षेत; 15 डिसेंबरपर्यंत प्रतिक्षेत असलेल्या घरकुलांना मंजुरी देण्याचे आदेश
बीड (रिपोर्टर) ज्यांना हक्काचा निवारा नाही त्यांना निवारा उपलब्ध करून देण्याची घोषणा केंद्राच्या ग्रामविकास विभागाने केलेली आहे. दरवर्षी जिल्हा पातळीवर हजारो घरकुलांना मंजुरी दिली जाते. मात्र हे घरकुले वेळेमध्ये पुर्ण होत नाहीत. बीड जिल्ह्यात 14 हजार 841 घरकुले अद्यापही अपुर्ण आहे तर 3920 घरकुल मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. 15 डिसेंबरपर्यंत जे घरकुल मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत त्यांना मंजुरीचे देण्याचे आदेश जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला ग्रामविकास विभागाने दिले आहेत.
देशामध्ये अनेक वंचीत घटकांना स्वत:च्या हक्काचा निवारा नाही. प्रत्येक कुटुंबाला घरकुल असावे, यासाठी केंद्राने घरकुल योजना सुरू केली आहे. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात हजारो घरकुलांना मंजुरी देऊन घरकुल पुर्ण केले जात आहे, मात्र काही ठिकाणी घरकुलाचे काम पुर्ण होण्यास अनेक अडचणी निर्माण होत असतात. कधी निधी वेळेवर मिळत नाही तर कधी प्रशासकीय पातळीवर उदासीनता दाखविली जाते. बीड जिल्ह्यात 14841 घरकुले अपुर्ण आहेत. हे घरकुल
कधी पुर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे तर 3920 घरकुले मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. जे घरकुल मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत त्यांना तात्काळ 15 डिसेंबरपर्यंत मंजुरी देण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला दिले आहेत.
अनेकांना जागाच नाही
घरकुल मंजूर झाल्यानंतर जागा असणे गरजेचे आहे मात्र बीड जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना जागा नसल्यामुळे त्यांचे घरकुल प्रलंबीत पडलेले आहेत. ज्या व्यक्तींना जागा उपलब्ध नाही अशांना जागा खरेदी करण्यासाठी पंडित दिनदयाल योजनेतून 50 हजार रुपये दिले जातात. मात्र महागाईच्या काळात 50 हजार रुपयात प्लॉट येत नाही. जागा खरेदी करण्यासाठी निधी वाढवण्याची मागणी केली जात आहे. प्लॉटअभावी कित्येकांचे घरकुल पेंडिंगमध्ये पडलेले आहे.