बीड (रिपोर्टर) जिल्हा परिषद शिक्षण विभागातील वरिष्ठ लेखा सहायक गोरे यांच्याबाबतीत सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षण विभागातील इतर कर्मचार्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या अनुषंगाने काल सीईओ अजित पवार यांनी तक्रारदार आणि गोरे यांची सुनावणी घेतली. या सुनावणीत गोरे हे दोषी आढळल्याने त्यांच्या निलंबनाचे आदेश बजावण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग नेहमीच चर्चेत असतो. गेल्या तीन महिन्यांपूर्वी एका उपशिक्षणाधिकार्याला कामातील तक्रारीवरून निलंबीत केले होते. त्यानंतर परत गोरे यांच्या बाबतीत सीईओंकडे अनेक तक्रारी केल्यानंतर सीईओ यांनी याबाबतची सुनावणी घेतली. शिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी यांचे इतर कर्मचार्यांवर कोणतेच नियंत्रण नसल्याने शिक्षण विभागात हे प्रकार घडतात. प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी चिरीमिरीकडे लक्ष न देता प्रशासन चोख करण्याकडे लक्ष द्यावे जेणेकरून शिक्षण विभागाची रुळावरून घसरणारी गाडी जागेवर येईल. त्यातच वरिष्ठ लेखा सहायक गोरे यांच्या बाबतीत अनेक सेवानिवृत्त शिक्षकांनी तक्रारी केल्याने आणि या तक्रारीत तथ्य आढळल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गोरे यांना निलंबीत करण्याचे आदेश काढले आहेत. त्यांच्या निलंबनाची फाईलही पुटअप् झाल्याचे शिक्षण विभागातील विश्वसनीय सुत्रांकडून समजते.