जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय; स्वयंसेवकांची नियूक्ती
बीड(रिपोर्टर) बीड शहरापासून 5 कि.मी. अंतरावर असलेल्या चर्हाटा फाट्याच्या परिसरात मुस्लिम धर्मियांचा दोन दिवसीय इज्तेमा होत आहे. या इज्तेमाला आज सकाळपासून सुरूवात झाली. या इज्तेमाला हजेरी लावण्यासाठी बीड शहरासह जिल्हाभरातील मुस्लिम बांधव विविध वाहनाने इज्तेमाकडे रवाना होवू लागले. जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवकांची नियूक्ती करण्यात आली आहे.
चर्हाटा फाट्याच्या परिसरात असलेल्या 200 एक्कर परिसरामध्ये मुस्लिम धर्मियांचा इज्तेमा होत आहे. या इज्तेमाला आजपासून सुरूवात झाली. जिल्हाभरातील भाविक विविध वाहनाने इज्तेमाकडे रवाना होवू लागले. इज्तेमाच्या स्थळी भाविकासाठी पिण्याच्या पाण्यासह जेवणाची सोय करण्यात आली. इतरही अनेक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जागोजागी स्वयंसेवक नियूक्त करण्यात आले. वाहतूकीला अडथळा निर्माण होवू नये म्हणून स्वयंसेवक तटस्थ रस्त्यावर उभा आहेत. या इज्तेमाला लाखो भाविकांची उपस्थिती राहणार आहे. दोन दिवस धर्मगुरू मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत.
मोफत प्रवासाची सोय
इज्तेमाकडे जाणार्या भाविकांसाठी बीड शहरातून विविध रस्त्यावर मोफत प्रवासाची सोय करण्यात आली. रिक्षा चालकासह इतर वाहनधारक भाविकांना इज्तेमास्थळी पोहचवण्याचे काम दिवसभर करत आहेत.
पार्कींगसाठी झोनची निर्मिती
दोन दिवसीय इज्तेमासाठी जिल्हाभरातून लाखो भाविक येणार असल्याने पार्किंगसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचे झोन बनविण्यात आले आहेत. त्या झोनमध्ये त्या त्या तालुक्यातील वाहनधारकांनी आपली वाहने उभी करावीत. त्या पद्धतीचे नियोजन आयोजकाकडून करण्यात आले आहे. इज्तेमासाठी आलेल्या एखाद्या भाविकास आरोग्याबाबत काही त्रास निर्माण झाल्यास त्यास प्राथमिक उपचार मिळावे म्हणून त्या ठिकाणी दवाखाना निर्माण करण्यात आला आहे.