पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबादच्या पोलिसांसह दोन एसआरपीच्या तुकड्या बीडमध्ये येणार
बीड (रिपोर्टर) महाराष्ट्रात सर्वाधिक बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. बीड जिल्ह्यात तब्बल 166 गावे संवेदनशील आहेत. यासह सर्व ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बाहेरचा बंदोबस्त मागवला आहे. त्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद येथील 500 पोलिस आणि 500 होमगार्ड यासह 100 जवानांची एक तुकडी अशा दोन तुकड्या एसआरपीच्या देखील जिल्ह्यात दाखल होणार आहेत.
बीड जिल्ह्यात काही ग्रामपंचायती अतिसंवेदनशील आहेत. त्याठिकाणी बुथ कॅप्चरींगसारख्या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आपल्या बीड जिल्ह्यातील सर्व पोलिस यासाठी कामाला लागले आहेत. मात्र ऐनवेळी काही प्रसंग उदभवला तर जास्तीचा फौजफाटा आपल्याकडे असावा या उद्देशाने पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बाहेरून 500 होमगार्ड आणि 500 पोलिस मागवले आहेत. त्याचबरोबर 200 एसआरपीचे जवान बीडमध्ये बंदोबस्ताकामी येणार आहेत. याशिवाय बीडचे 600 होमगार्ड आणि जिल्हा पोलिस दल निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी तैनात आहे.
गोंधळ घालणारांची गय करणार नाही
निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचा गावोगावी तगडा बंदोबस्त आहे. कोणीही कायदा हातात घेवू नये, शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडावी. गोंधळ घालणारांची गय केली जाणार नाही.
-नंदकुमार ठाकूर
पोलिस अधिक्षक बीड