बीड (रिपोर्टर) वरिष्ट पातळीवरील बदल्या सध्या होत आहेत. आयजी लेव्हलच्या बदल्या काही दिवसात होणार आहेत. बीड जिल्ह्यात 18 तारखेला ग्रामपंचायतचे मतदान आहे. ही मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर 20 तारखेपासून बीड जिल्ह्यात ठाणेप्रमुखांची खांदेपालट होणार असल्याचे संकेत पोलिस अधिक्षकांनी दिले आहेत. जिल्ह्यातील अनेक ठाणेप्रमुखांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. तर काही ठाणेदारांचा त्या ठाण्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते बदलीस पात्र आहेत. मात्र काही ठाण्याच्या हद्दीत एसपींनी आदेश देवूनही अवैध धंदे जोरात सुरू आहेत. अशा ठाणेप्रमुखांनाही दणका बसण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसापासून बीड जिल्हा पोलिस दलात बदलीचे वारे सुरू आहे. कालच बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख भागवत फुंदे यांची जालना येथे बदली झाली आहे. त्याचबरोबर रविंद्र गायकवाड यांची उस्मानाबादला शेषेराव उदार हे औरंगाबादला तर सिध्दार्थ माने जालन्याला गेले आहेत. तर बीडला जालन्यात वादग्रस्त ठरलेले शितलकुमार बल्लाळ यांच्यासह औरंगाबादहून बालकोळी येत आहेत. तर एपीआय संवर्गातील लक्ष्मण केंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे ज्ञानेश्वर कुकलारे, प्रमोण भिल्लारे यांची औरंगाबाद ग्रामीणला बदली झाली आहे तर पीएसआय संवर्गातील लहुजी गोरे, विलास चव्हाण, रियावुद्दीन शेख यांच्या औरंगाबाद ग्रामीण येथे तर वैशाली केतकर यांची उस्मानाबादला बदली झाली आहे. औरंगाबादहून रणजीत कोसले, शैलेश जोगदंड आणि उस्मानाबादहून हिना कौसर शेख हे तीन फौजदार बीडमध्ये येत आहेत. बीड जिल्ह्यात अनेक ठाणेप्रमुखांचा ठाण्याचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे तर काही ठाणेप्रमुखांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते बाहेर जिल्ह्यास जाणार आहेत. त्यामुळे निवडणूका पार पडताच बीड पोलिस दलात खांदेपालट होणार आहे.
अवैध धंद्याला अभय देणार्या
ठाणेदारांची होणार उचलबांगडी
पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पदभार घेताच सर्व ठाणेदारांना आपापल्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याच्या सक्तीच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनंतरही काही ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे विशेष पथकाने, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वेळोवेळी केलेल्या कारवाईतून सिध्द झाले. त्यानंतर पोलिस अधिक्षकांनी काही ठाणेदारांना आपल्या हद्दीतील अवैध धंदे बंद करा अशा लेखी स्वरूपाच्या नोटीसा बजावल्या होत्या. तरी देखील काही ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत. या ठाणेदारांची येत्या काही दिवसात उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.
इच्छूकांची लॉबिंग, कर्तव्यात
चुणूक दाखवणार्यांनाच मिळणार ठाणे
बीड पोलिस दलात गेल्या काही दिवसापासून बदलीचे वारे वाहत आहेत. अनेक पीआयसह एपीआय दर्जाच्या अधिकार्यांना ठाणे मिळावे म्हणून त्यांनी लॉबिंग लावण्याचे काम सुरू केले आहे. मात्र कर्तव्यात चुणूक दाखवणार्यांनाच ठाणे मिळणार असल्याचे वरिष्ठांनी सांगितले.