मुंबई: महापुरुषांबद्दल गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चात विरोधकांचा समाचार घेतला. महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त वक्तव्य, कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातील बाहेर चाललेले उद्योग याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता.
महामोर्चात बोलताना शरद पवार म्हणाले, आज आपण महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकत्र आलो आहोत. छत्रपतींचे नाव लोकांच्या मनावर अखंड आहे. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. देशात कोणत्याही राज्यात केलो तरी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे नाव आदराने घेतले जाते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना लवकरात लवकर हाकला. महाराजांचा अपमान करणाऱ्यांना राज्यातून हाकला त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी पवारांनी केली. राज्यात असलेल्या सरकारमध्ये महाराष्ट्राची बदनामी करण्याची स्पर्धा सुरू असल्याची टीका सुरू असल्याचे ते म्हणाले.
या मोर्चाच्या माध्यमातून आज जो इशारा सरकारला देण्यात आला आहे त्याची दखल घेतली गेली नाही तर लोकशाहीच्या माध्यमातून राज्यातील जनता त्यांना थडा शिकवेल असा विश्वास पवारांनी यावेळी व्यक्त केला. फुले, शाहू, आंबेडकर आणि कर्मवीर ही आदराची स्थाने आहेत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अशी वक्तव्य करणाऱ्यांबद्दल शरम वाटली पाहिजे. ज्यांनी शिक्षणासाठी मोठे काम केले. त्यांची टिंगळ टवाळकी केली जाते असेल तर राज्यकर्ते म्हणून त्यांना तेथे राहण्याचा अधिकार नाही.
सरकारमध्ये एक स्पर्धा सुरू झाली आहे. ही स्पर्धा कशाची तर कौतुकाची किंवा विकासाची नाही तर राज्याच्या बदनामी करण्याची आहे. एका मंत्र्याने असा उल्लेख केला की फुले, आंबेडकर आणि कर्मवीर यांनी शिक्षण संस्था सुरु करण्यासाठी लोकांकडून भीक मागितली. या लोकांनी राज्यात ज्या ठिकाणी शिक्षणाची सोय नव्हती तेथे संस्था सुरू केल्या. अशा लोकांबद्दल गलिच्छ शब्द वापरले जात असेल तर त्यांना धडा शिकवण्याचे काम तुम्हाला करावे लागले.