बीड (रिपोर्टर) अटीतटीच्या लढतीमध्ये बीड जिल्ह्यातल्या 671 ग्रा.पं.साठी काल मतदान पुर्ण झाले. गावची निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पॅनल प्रमुखाने प्रतिष्ठा पणाला लावली होती. मतदारांना जोडता जोडता पॅनलप्रमुखांच्या तोंडाला अक्षरश: फेस आला होता. ग्रामपंचायत निवडणूक महत्वाची असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काल मतदान झाल्यानंतर उद्या त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. यात काहींना गुलाल तर काहींना बुक्का लागणार आहे. अनेकांनी आपणच जिंकणार, असा आत्मविश्वास काल पासूनच दाखवायला सुरुवात केली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये 671ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. या निवडणुकीसाठी काल जिल्हाभरात शांततेत मतदान झाले. जवळपास 80 टक्के मतदान झाले. गावपातळीवर ग्रामपंचायत महत्वाची असते. ग्रा.पं. जिंकण्यासाठी गावपुढार्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये तीन ते चार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या निवडणुकीमध्ये तालुका पातळीवरील राजकीय नेत्यांनी लक्ष घातले होते. काल मतदान झाल्यानंतर अनेकांनी आपणच जिंकणार, असे दावे करायला सुरुवात केली. मतदान झाल्यानंतर आकडेमोड करत आपण किती लिडने निवडून येणार असेही अंदाज लावले जाऊ लागले. उद्या प्रत्येक तालुका पातळीवर त्या त्या तहसीलअंतर्गत मतमोजणी पार पडणार आहे. उद्याच्या मतमोजणीमध्ये कोणतं पॅनल येणार, कोणाला गुलाल लागणार आणि कुणाला बुक्का लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विशेष करून ज्यांनी ज्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला अशांची चांगलीच धाकधूक वाढली असल्याचे दिसून येत आहे. मतदार गावागावांत कोणाच्या बाजुने कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या ठिकाणी होणार मतमोजणी
आयटीआय कॉलेज, बीड पंचायत समिती गेवराई
आयटीआय कॉलेज, आष्टी
पाटोदा तहसील कार्यालय
शिरूर तहसील कार्यालय
वडवणी तहसील कार्यालय
मालगाव तहसील कार्यालय
शासकीय अध्यापक महाविद्यालय अंबाजोगाई
धारूर तहसील कार्यालय
परळी तहसील कार्यालय