बीड (रिपोर्टर) गावकी ताब्यात घेण्यासाठी भावकी भावकीत गावपुढार्याने वाद लावले. अनेक मातब्बरांनी प्रतिष्ठेसाठी गावात ठाण मांडून कारभारी होण्यासाठी गेल्या महिनाभरापासून जिवाचं राण केले. काल प्रत्यक्ष मतदान झाले. रात्रीपासून उद्यापर्यंत आकडेमोड सुरू आहे. कोणत्या नागरिकाने कोणाला मत केले, आपल्याला किती मत पडणार? याची आकडेमोड सध्या गावागावातील चौकाचौकात सुरू आहे. ज्या गावात सत्ताधार्यांनी विकासाचे गाजर दाखवले. त्या प्रत्येक गावात परिवर्तनाचे वारे दिसून आले. या पंचवार्षिक निवडणूकितही गावचा कारभारी थेट जनतेतून असल्याने अनेकांनी अपक्ष म्हणूनही सरपंचाला अर्ज भरले तर पॅनलचीही संख्या वाढली. त्यात नोटांचे बटन असल्याने ईव्हीएमवर चिन्हांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे आपल्याला मत नेमकं कोणत्या उमेदवाराला टाकायचे ते मतदान कक्षात गेल्यावर अनेक सुशिक्षीत नागरिकही गोंधळून गेले.
बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यापासून गावपुढारी कामाला लागले होते. काल प्रत्यक्षात 671 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. मतदानाची फोडाफोड करण्यासाठी अनेकांनी जास्तीचे पॅनल उभे केले. काहींनी तिसरी आघाडी म्हणून गावात परिवर्तनाची लाट निर्माण केली. जनतेतून सरपंचाची थेट निवड असल्याने अनेकांनी अपक्ष म्हणून सरपंचपदाची निवडणूक लढविली. त्यात शासनाने एकही उमेदवार नको म्हणून उमेदवारांना नोटाचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे ईव्हीएम मशीनवर उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे आपल्या उमेदवाराला मत टाकताना मतदार चांगलाच गोंधळून गेला. आपल्या डोक्यात ठेवलेले चिन्ह त्याला ईव्हीएम मशीनवर लवकर सापडत नव्हते. ही परिस्थिती सुशिक्षित मतदारांचीही दिसून आली.