परळी (रिपोर्टर)- अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी आज प्रत्यक्षात सुरू झाली. तेव्हा पहिला निकाल अंबाजोगाई तालुक्यातील सुगावचा आला. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंचपदासह 9 सदस्य मोठ्या मताधिक्याने निवडून आले. नाथ्रा ग्रामपंचायत ही माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली असून मुंडेंच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड जल्लोष साजरा करण्यात येत आहे. दुपारपर्यंतच्या निकालामध्ये सर्वाधिक 28 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला असून भाजपाला केवळ 12 जागांवर विजय मिळवता आला आहे. धनंजय मुंडेंनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
परळी तालुक्यातील भाऊ-बहिणीची राजकीय लढाई अवघ्या राज्याला ठाऊक आहे. ग्रामपंचायतींचे निकाल आज सकाळपासून जसे जसे हाती येऊ लागले तसे तसे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना दिसून आले. पहिला निकाल हा सुगावचा आला आणि त्याठिकाणी सरपंचपदासह राष्ट्रवादीचे नऊ सदस्य निवडून आले. दुसरा निकाल सेलूअंबा येथील राष्ट्रवादीच्या ललिताबाई भगवान औताडे सरपंचपदाच्या उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या तर पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडेंच्या ताब्यात आली. इकडे नाथर्यावरही धनंजय मुंडेंचा वचरष्मा राहिला. त्याठिकाणी राष्ट्रवादीचे अभय मुंडे 648 मते घेऊन विजयी झाले. दुपारपर्यंतच्या निकालामध्ये 28 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला गेला होता तर 12 ग्रामपंचायती या भाजपाच्या ताब्यात गेल्या होत्या.