बीड(रिपोर्टर): पत्रकाराचा चष्मा हा समाजातील वाईट विपरीत गोष्टी पाहतो. त्या गोष्टी समाजासमोर आणि सरकारसमोर मांडतो. हे मांडताना पत्रकाराच्या पाठीवर समाजातील चांगल्या विचाराच्या लोकांची थाप पडत असली तरी त्या पत्रकाराला विरोधक आणि दुश्मणही तयार होतात. परंतू सत्य हे समाजासमोर मांडणे आणि समाजाचा सर्वांगिन विकास करून घेणे हा निश्चय त्या पत्रकाराच्या मनी असतो. समाजकारण करताना त्याला जर राजकारणाची जोड भेटली, सत्ताकारणाचे आशिर्वाद मिळाले तर तो नक्कीच त्या गावचा, त्या जिल्ह्याचा अथवा त्या प्रांताचा सर्वांगिन विकास करू शकतो. हे उघड सत्य नाकारता येणारे नाही म्हणूनच समाजकारण करणारे काही तरुण आता सत्ताकारणाचे गणीत जुळवत राजकारणामध्ये येतात. काहींना यश मिळते तर काहींना अपयश मिळते. मात्र ज्याची नाळ गावशी जुळलेली आहे त्या पत्रकाराला नक्कीच सत्ताकारणाचं गणीत जुळवता येतं. असंच गणीत सायं.दै. बीड रिपोर्टरचे गेवराई तालुका प्रतिनिधी भागवत जाधव यांना जुळवता आलं. अन् त्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये गावकर्यांसह मतदारांच्या बळावर मातोश्री लताबाई राधाकिसन जाधव यांना निवडून आणलं. गेल्या दशकभराच्या पत्रकारीतेतील सकारात्मक दृष्टीकोन आता भागवत जाधव हे ठाकार आडगाव, बेलगुडवाडी, कोलतेवाडी या तीन गावाच्या नागरीकांसाठी विकासात्मक दृष्टीकोन ठेवून काम करणार आहेत.
गेवराई तालुक्यातील ठाकरआडगाव, बेलगुडवाडी, कोलतेवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत तब्बल 2500 मतांची. या ठिकाणी आजपर्यंत प्रस्तापित आणि मातब्बरांनी सत्ता गाजविली. गेवराई म्हटलं की, समाजकारणापेक्षा राजकारणाला अधिक महत्त्व दिलं जातं. त्या गेवराईमध्ये सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लोकांसमोर जाणं आणि विजयाचा अश्व दौडणे एवढे सोपे काम नाही. मात्र पत्रकार भागवत जाधव यांनी बेलगुडवाडीत 531 मतदान असतांना आणि ठाकर आडगावात हजारापेक्षा जास्त मतदान असतांना केवळ समाजकारणाच्या धोरणावर निवडणूकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या मातोश्री लताबाई राधाकिसन जाधव यांना निवडणूक रिंगणात उतरविले. प्रतिस्पर्धी साहजिकच मातब्बर आणि प्रस्तापित होते. परंतू बेलगुडवाडीच्या गावकर्यांनी एकत्रित येवून आपल्या गावचा सरपंच कधी झाला नाही, त्यात आपल्या गावचा विकास नाही अशा वेळी सर्वसामान्य लोकांच्या सर्वांगिन कामासाठी पडणारा भागवत याला या वर्षी निवडणूक आखाड्यात आणायचे म्हणून गावकर्यांनी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तु निवडणूकीला सामोरे जा असा शब्द दिला. तेव्हा भागवत याने ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यापेक्षा विकासात्मक दृष्टीकोन ठेवून तिन्ही गावातील मतदारांना पुढच्या पाच वर्षाच्या विकासात्मक गणीत सांगितले. विशेष म्हणजे बेलगुडवाडीच्या 531 मतदारांपैकी तब्बल 460 मतदारांनी भागवत याच्या मातोश्रीला मतदान दिले तर अन्य दोन गावातील मतदारांनीही भागवतचा विजय सुकर होईल अशा पद्धतीने मतदान करत प्रस्तापित नाही तर विस्थापित माणसाच्या हाती तीन गावची ग्रामपंचायत दिली. 10 वर्षाच्या पत्रकारीतेमध्ये विकास कशाला म्हणतात, योजना काय असतात, त्या कुठून आणायच्या, पुर्णत्वाकडे कशा घेवून जायच्या, गावचा सर्वागिन विकास करताना रस्ते, नाली, पाणी यासह अन्य सुविधा कशा द्यायच्या हे भागवत याला सर्वश्रूत आहे. आज गावकर्यांनी पत्रकाराच्या हाती सत्ताकारणाची सूत्र दिली. ते सकारात्मक दृष्टीकोणामुळेच.