बीड (रिपोर्टर) एखादा समाज संपवायचा असेल तर त्या समाजाच्या तरूणाला सुखासिन करा, व्यसनी करा म्हणजे तो समाज संपेल. स्वामी विवेकानंद म्हणायचे एखाद्या वेळेस मंदिरात जावू नका परंतू मैदानात जा. मला बलशाली भारत हवा आहे. बलशाली तरूण हवा आहे. स्वत:च देशाला शक्तीशाली बनवायचे असेल आणि नशा करायचीच असेल तर ती नशा देशभक्तीची करा. असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित तरूणांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.
ते बीड येथे कै.अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठाणच्यावतीने आयोजीत व्यसनमुक्त रॅलीच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपिठावर शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे, पालकमंत्री अतुल सावे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ.सुरेश धस, आ.लक्ष्मण पवार, रमेश आडसकर, राजेंद्र मस्के, प्रभाकर कोलंगडे, सी.ए.जाधव, तानाजी शिंदे, रामहरी मेटे, रमेश पोकळे, अक्षय मुंदडा, भिमराव धोंडे, आशिष मेटे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्व.विनायक मेटे यांनी संपूर्ण जीवन समाजासाठी अर्पण केले. समाज कार्याबरोबर समाजाचे प्रबोधन व्हावे यासाठी ते प्रबोधनात्मक उपक्रम राबवायचे. आता मेटेंचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्योतीताई मेटे या पुढे आल्या आहेत. त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले सर्वप्रथम 2015 साली मी मुख्यमंत्री असताना मेटे माझ्याकडे व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण देण्यासाठी आले तेव्हा मी त्यांना चेष्टेने म्हणालो, या कार्यक्रमात माझे काय काम? मी तर एकही व्यसन करत नाही, तेव्हा मेटे म्हणाले, म्हणून तर न्यायचे आहे, तरूणांना सांगायचं आहे, व्यसन केले नाही तर माणूस मुख्यमंत्री होतो. यावेळी फडणवीसांनी विनायक मेटेंच्या विविध आठवणींना उजाळा दिला. पुढे ते म्हणाले, मेटेंची ही परंपरा पुढे नेण्यासाठी आपण ज्योतीताई मेटेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. व्यसनाविरूध्द लढणे म्हणजे युध्द लढण्यासारखे आहे. एखादा समाज संपवायचा असेल तर त्या समाजातल्या तरूणाला सुखासीन करा, व्यसनी करा म्हणजे तो समाज संपेल. स्वामी विवेकानंद म्हणायचे, मला बलशाली भारत हवा आहे. बलवान तरूण हवा आहे. एखाद्यावेळेस मंदिरात जावू नका, परंतू फुटबॉलच्या मैदानात जावून खेळा, घरी बसून भक्ती करा. आपले शेजारी राष्ट्र पाकिस्तान हे आपल्यासोबत समोरासमोर युध्द खेळत नाही. छुपे युध्द खेळतो. आम्ली पदार्थ पाठवतो. तरूणांना व्यसनी करतो. पंजाबमध्ये मध्यंतरी आपण मोठ्या प्रमाणावर आम्ली पदार्थाचा साठा जप्त केला होता. व्यसनामुळे श्रध्दा, दृढता कमी होत असल्याचे सांगत याविरूध्द आपणास लढा उभारावयाचा आहे. दारूने संसार उध्वस्त होतो हे आपण अनेकवेळा पाहिले आहे. या व्यसनामुळे भारत कॅन्सरची राजधानी होवू पाहत असल्याची भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली. ज्यावेळी क्रांतिकारांना विचारले जायचे तुम्हाला व्यसन कुठले आहे तेव्हा ते म्हणायचे देशभक्तीचे व्यसन. हे एवढेच व्यसन आपण सर्वांना असले पाहिजे. जेव्हा मन कमजोर होते तेव्हा ते व्यसनाधिनतेकडे वळते. आज जी शपथ आपण घेत आहोत. त्या शपथेचे काटेकोरपणे पालन करा. आजच्या तरूणांनी आणि उपस्थित मुलांनी आपल्या घरातील वडिलधार्यांना व्यसनापासून प्रवृत्त करण्यासठी प्रयत्न करा. सरकारने आम्ली पदार्थाविरूध्द मोठी मोहिम उघडली आहे. चार हजार कोटी रूपयाचे आम्ली साहित्य जप्त केले असल्याचे सांगून व्यसनमुक्तीचे हे स्व.मेटेंचे हे कार्य उभ्या महाराष्ट्रात नेवू असा विश्वास देत ज्योतीताई मेटेंना ताकद देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना तर दिलेच. व्यसनमुक्तीची शपथही फडणवीसांनी यावेळी दिली.