बीड (रिपोर्टर) युवा सेनेतील तालुकाप्रमुखाने वरिष्ठ पदाधिकार्याकडून त्याची आर्थिक फसवणूक होत असून त्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचे पत्र सोशल मिडियावरून व्हायरल केले होते. तरी देखील याची कसलीही दखल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने घेतली नसल्याने त्या पदाधिकार्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटात अक्षय भुमकरच नव्हे तर अनेक युवकांची आर्थिक फसवणूक होत आहे. अक्षय भुमकरची फसवणूक करणार्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही एसपींना भेटलो असल्याची माहिती युवासेना (बाळासाहेबांची शिवसेना) सहसचिव शर्मिला येवले यांनी दिली.
बीडच्या अक्षय भुमकरने ठाकरे गटातील वरिष्ठांना कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याची दखल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन त्यांचे प्रतिनिधी म्हणून शर्मिला येवले यांना बीडमध्ये पाठवले होते. येवले यांनी आज सकाळी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना येवले म्हणाल्या की, 28 डिसेंबर 2022 रोजी ठाकरे गटातील युवा सेनेचे तालुकाप्रमुख अक्षय भुमकर यांनी वरिष्ठ पदाधिकार्याकडून त्याची फसवणूक होत असून त्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचे सोशल मिडियावरून पोस्ट केली होती. मात्र ठाकरे गटाकडून याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अक्षयने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन मला त्याची भेट घेण्यासाठी पाठवले आहे. मी त्याची भेट घेतली असता त्याने शिवसेनेतील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळूनच आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले. या प्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी आम्ही एसपींना भेटलो असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली असल्याचे या पत्रकार परिषदेत शर्मिला येवले म्हणाल्या.