धनंजय मुंडेंच्या गाडीला रात्री अपघात
मुंडे किरकोळ जखमी, उपचारार्थ मुंबईला रवाना; डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला
अफवांवर विश्वास ठेवू नका, मुंडेंचं ट्विट
परळी (रिपोर्टर) दिवसभर मतदारसंघातील विविध कार्यक्रमांसह भेटीगाठी आटोपून रात्री उशीरा घराकडे परतणारे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला साडेबारा वाजण्याच्या सुमारास मौलाना आझाद चौकात अपघात झाला. वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून धनंजय मुंडे यांना किरकोळ मार लागला आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असून बरगडीला झालेल्या किरकोळ दुखापतीवर उपचार घेण्यासाठी मुंडे हे मुंबईतील ब्रिजकँडी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रवाना झाले आहेत. मुंडेंनी फेसबुक व ट्विटद्वारे काळजी घेण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे म्हटले आहे.
याबाबत अधिक असे की, मंगळवारी दिवसभर माजी मंत्री तथा आ. धनंजय मुंडे हे मतदारसंघामध्ये होते. आयोजीत कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती दर्शविली. मतदारसंघातील लोकांसोबत भेटीगाठी घेतल्या. हे सर्व कार्यक्रम आटोपून ते परळीकडे परतत असताना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या वाहनावरील चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला आणि गाडीला अपघात झाला. या अपघातात धनंजय मुंडे यांना किरकोळ मार लागला आहे. सदरचा अपघात हा शहरातील मौलाना आझाद चौकात झाला. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा प्रकारचे ट्विट करत डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याचे त्यांच्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. या अपघातात त्यांच्या बरगडीला किरकोळ मार लागला आहे. त्या उपचारार्थ ते मुंबईसाठी रवाना झाले असून त्यांना ब्रीजकँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.