बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात 2019 मध्ये गाजलेल्या भाजप नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड खून प्रकरणातील निकाल देतांना अंबाजोगाई सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सहा पैकी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तर यातील एक आरोपी अजूनही फरार आहे. विशेष म्हणजे या खटल्याकडे संपूर्ण अंबाजोगाई शहराचे लक्ष लागले होते. दरम्यान तब्बल चार वर्षांनी न्यायालयाने यावर निकाल दिला आहे. करण जोगदंड, अर्जुन जोगदंड, मालू जोगदंड, मनोज जोगदंड, विजय जोगदंड असे निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या भावांची नावं असून, राज जोगदंड अद्यापही फरार आहे.
आपल्या भावाला मारहाण होत असल्याची माहिती मिळाल्याने भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विजय जोगदंड यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. सहा भावांनी मिळून केलेल्या हल्ल्यात विजय यांचा मृत्यू झाला होता. तर याप्रकरणी विजय जोगदंड यांचे बंधू नितीन जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादिवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीस निरिक्षक सोमनाथ गिते यांनी या सर्व प्रकरणाचा तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. तर या प्रकरणाची जिल्हा व सत्र न्या. खोचे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. तसेच दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी करण जोगदंड, अर्जुन जोगदंड, मालू जोगदंड, मनोज जोगदंड, विजय जोगदंड या पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
हल्ला करत जीव घेतला!
विजय जोगदंड यांनी घटनास्थळी जाऊन, नितीनला मारहाण करणार्या सहाही भावांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी यातील राज याने तलवारीने तर, करण याने कोयत्याने विजय यांच्यावर हल्ला करत त्यांच्या डोक्यात, कानावर, गालावर आणि हातावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात विजय हे गंभीर जखमी झाले होते. तर तिथे उपस्थित असलेला नितीनने जीवाच्या भीतीने पळ काढला. दरम्यान विजय जोगदंड रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्ला करणारे सहा भाऊ देखील घटनास्थळाहून पसार झाले. तर गल्ल्तील लोकांनी विजय जोगदंड यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असल्याचं नितीन जोगदंड याने आपल्या तक्रारीत म्हटले होते.
काय आहे प्रकरण?
मयत विजय जोगदंड यांचा लहान भाऊ नितीन जोगदंड याने पोलिसांत तक्रार देताना म्हटले होते की, त्याचे (नितीन) आणि त्याच्याच भावकीतील एका महिलेचे अनैतिक संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे भावकीतील भगवान दत्तू जोगदंड आणि त्यांचे मुलांचा त्याच्यावर राग होता. दरम्यान 18 जानेवारी 2019 रोजी रात्री आठ वाजता नितीन परळी वेस परिसरातील समता नगरमध्ये जाणार्या कमानीजवळ थांबला होता. दरम्यान याचवेळी त्याठिकाणी राज उर्फ रांजन्या भगवान जोगदंड, मनोज उर्फ मान्य भगवान जोगदंड, विजय भगवान जोगदंड, अर्जुन भगवान जोगदंड, मालू भगवान जोगदंड आणि करण भगवान जोगदंड हे सख्खे भाऊ तिथे आले. यावेळी त्यांच्या हातात तलवार, गुप्ती आणि कोयता देखील होते. तर नितीनला त्यांनी शिवीगाळ करत त्याच्यावर गुप्तीने वार केला. त्याला मारहाण होत असल्याची माहिती मिळताच त्याचे मोठे बंधू तत्कालीन नगरसेवक विजय जोगदंड यांनी घटनास्थळी धाव घेतली.