मुंबई/बीड (रिपोर्टर) माजी मंत्री धनंजय मुंडे हे मागील 16 दिवसांपासून मुंबईच्या ब्रिजकँडी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. त्यांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून पुढील काही दिवस डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मुंडेंच्या बरगडीला मायनर फ्रॅक्चर आहे, ऑपरेशनची गरज नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. धनंजय मुंडे यांच्यावर डॉ. प्रतित समदानी यांनी उपचार केले. आज डिस्चार्ज घेताना डॉक्टरांसह रुग्णालय प्रशासन आणि कर्मचार्यांचे धनंजय मुंडे यांनी आभार मानले.
गेल्या 16 दिवसांपूर्वी परळीमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात मुंडे हे जखमी झाले. त्यांना तात्काळ मुंबईतील ब्रिजकँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या बरगडीला मायनर फ्रॅक्चर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र सुदैवाने ऑपरेशनची गरज भासली नाही. गेल्या 16 दिवसांच्या कालखंडात धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस भ्रमणध्वनीवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे, संजय राऊत, छगन भुजबळ यांच्यासह आदी बड्या नेत्यांनी रुग्णालयात जावून धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची चौकशी केली होती. 16 दिवसांच्या कालखंडात उपचार घेत असताना येथील डॉक्टर प्रतित समदानी यांनी मुंडेंच्या प्रकृतीकडे बारकाईने लक्ष दिले. आज मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढील काही दिवस सक्तीची विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. काही दिवस मुंडेंना प्रवास टाळावा लागणार आहे. आज डिस्चार्ज झाल्यानंतर उपस्थित डॉक्टरांसह रुग्णालय प्रशासन आणि कर्मचार्यांचे धनंजय मुंडे यांनी आभार मानले.
लवकरच आपल्या सेवेत -धनंजय मुंडे
डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे आणि प्रवास टाळण्याबाबत सूचना दिल्यामुळे आपण काही दिवस मुंबईतच विश्रांती घेणार असल्याचे सांगत नंतर परळी येथे येऊन सर्वांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. दोन -तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा आपल्या सेवेत असेल, असेही मुंडे यांनी म्हटले.