बीड (रिपोर्टर) पांढरं सोनं म्हणून ओळख असणार्या कापसाला अजून तरी चांगला भाव मिळत नसल्याने शेतकर्यांनी कापूस घरातच थप्पी मारून ठेवला. सुरुवातीच्या कार्यकाळात कापसाला चांगला भाव मिळाला होता. मात्र मध्यंतरी कापसाचे भाव गडगडले. आंतरराष्ट्रीय पातळीवरही आजस्थितीत कापसाला तितका भाव नसल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यात सर्वाधिक कापसाचं उत्पादन घेतलं जातं. कापसाचे भाव कमी असल्यामुळे बाजारातील उलाढालही चांगलीच मंदावली आहे.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात कापसासह सोयाबीनचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. यावर्षी जिल्ह्यात 4 लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड करण्यात आली होती. गतवर्षी कापसाला शेवटपर्यंत 14 हजारापर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे यावर्षीही चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्यांकडून करण्यात येत होती. मात्र सध्या कापसाचे भाव गडगडले. दिवाळीनंतर बर्यापैकी कापसाला भाव मिळाला होता. काही शेतकर्यांनी त्यावेळी कापूस (विकला पण आजस्थितीत कापसाला चांगला भाव नसल्यामुळे शेतकर्यांनी कापूस घरामध्ये थप्पी मारून ठेवला. संक्रातीनंतर तरी कापसाचा भाव वाढेल, अशी अपेक्षा होती, मात्र अद्यापही भाव वाढला नसल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. कापसाची खरेदी तेजीत झाल्यास याचा परिणाम बाजारातील उलाढालीवर होत असतो. कापूस विक्रीला येत नसल्याने बाजारपेठेत मंदी असल्याचे दिसून येत आहे.