वेळोवेळी अहवाल पाठवूनही शिक्षक भरले जात नाहीत
बीड (रिपोर्टर) शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेवर शिक्षकांच्या सर्व जागा भरल्या पाहिजेत, असा नियम असतानाही या नियमाला तिलांजली देत शिक्षकांच्या रिक्त जागा वर्षानुवर्षे भरल्या जात नाहीत. शाळेवर अपुरे शिक्षक असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बीड जिल्ह्यातील 12 माध्यमिक उर्दू शाळांमध्ये दहा शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा पाठपुरावा करूनही भरल्या जात नाहीत. सदरील जागा तात्काळ भरून मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षकांअभावी गावकर्यांना आंदोलन करावे लागते. बीड जिल्ह्यातील उर्दू माध्यमिक शाळेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दहा शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा भराव्यात, असा वेळोवेळी अहवाल पाठवूनही शिक्षण विभाग मात्र सदरील जागा भरत नाही. जि.प. माध्यमिक शाळा मुलींची गेवराई, माजलगाव, पात्रुड, अंबाजोगाई, सायगाव या शाळांवर शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. एकूण दहा शिक्षक कमी असल्यामुळे त्याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांच्या वेळेवर जागा भराव्यात, असा नियम असताना या नियमाचे पालन हातेाना दिसून येत नाही. केज येथील माध्यमिक उर्दू शाळा तर शिक्षकांअभावी बंद पडली आहे.