पुणे (रिपोर्टर) एमपीएससी परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागून करावा. या मागणीसाठी पुण्यातील अलका चौकात आज (ता. 31 जानेवारी) ’एमपीसी’च्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार यांनी विद्यार्थी आंदोलकांना भेट देत विद्यार्थ्यांच्या मागण्याशी आम्ही सहमत आहोत, असे सांगत या आंदोलनास आपला पाठिंबा दिला.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सांगण्यात आल्या. यावर बोलताना फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, विद्यार्थ्यांच्या मागण्या या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोचवल्या जातील आणि नक्कीच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, 2025 पासून हा नवीन पॅटर्न लागू करण्यात आल्यावर पुन्हा 2027 ची मागणी विद्यार्थ्यांनी करू नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले, आपल्या मागण्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपल्यासमोरच फोनवर बोलणं झालं आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नक्कीच सकारात्मक निर्णय होईल आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होतील. फडणवीस यांनी कुठला विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडला आणि तो मान्य होणार नाही असं कधी होत नाही, यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. जोपर्यंत आपल्या मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आपण इथून उठू नये मी देखील आपल्या आंदोलनात सहभागी असणार आहे, असेही पवार म्हणाले.