बीड (रिपोर्टर) नोकरीसह बदल्यांसाठी बोगस अपंगाचे प्रमाणपत्र अनेक शिक्षकांनी शिक्षण विभागात दाखल केल्यानंतर हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे याआधी निष्पन्न झाल्याने 52 शिक्षक निलंबीत झाले होते. पाठोपाठ आता 26 शिक्षकांच्या अपंगाच्या प्रमाणपत्रावर अंबाजोगाई येथील मेडीकल बोर्डाने आक्षेप नोंदवत टक्केवारी कमी असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या 26 शिक्षकांची सुनावणी आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुरू केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी सखोल चौकशी सुरू ठेवल्याने या 26 शिक्षकांची धाकधूक वाढली असून यांच्यावर उद्यापर्यंत निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. (पान 7 वर)
बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागात सातत्याने भोंगळ कारभार होत असल्याची ओरड होत आली आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षक गलेलठ्ठ पगारी घेत ग्रामीण भागातील शाळेवर सातत्याने गैरहजर राहतात. अनेक ठिकाणी शिक्षक नसतात. यापुढे जात या शिक्षकांनी चारसौ बीसगिरी केल्याचेही काही दिवसांपूर्वी निदर्शनास आले. शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी आणि जवळच्या ठिकाणी ऐच्छीक गावात, ऐच्छीक शाळेवर बदली व्हावी यासाठी थेट अपंगाचे बोगस प्रमाणपत्र शिक्षण विभागात दाखल केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी 52 शिक्षकांना निलंबीत केले होते. मात्र आता पुन्हा 26 शिक्षकांबाबत अंबाजोगाई मेडिकल बोर्डाने त्यांनी दाखल केलेल्या अपंग प्रमाणपत्रावर आक्षेप नोंदवत अपंगाची टक्केवारी कमी असल्याचे आणि अन्य गंभीर सबबी अहवालात सादर केल्या. याची गंभीर दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी घेतली आणि आज सकाळी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत अपंगाचे बोगस प्रमाणपत्र दाखल करणार्या 26 शिक्षकांची सुनावणी सुरू झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रमोद काळे हे दुपाी एक वाजेपर्यंत सुनावणी घेत होते. या प्रकरणी अद्याप जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून या शिक्षकांबाबत निर्णय झाला नसला तरी उद्या सकाळपर्यंत या 26 जणांवर निलंबनाची कारवाई अटळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या शिक्षकांची धाकधूक वाढली आहे.
बोगस प्रमाणपत्र देणार्या डॉक्टरांचा
शोध घ्या गुन्हे दाखल करा
खर्या अंध, अपंग, कर्णबधीरांच्या हक्कावर गदा आणणार्या आणि पैसे घेऊन या शिक्षकांना बोगसप्रमाणपत्र देणार्या डॉक्टरांचा शोध घ्या, त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर त्यांचा आणि त्यांच्या रुग्णालयाचा उघड पत्ता असणार आहे. त्यामुळे ज्या ज्या डॉक्टरांनी असे प्रमाणपत्र दिले आहे, त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.
बोगस प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवणार्या शिक्षकांचे काय
अपंगाचे बोगस प्रमाणपत्र देऊन अनेक शिक्षकांनी नोकर्या मिळवल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असल्याचे सांगण्यात येते. मात्र या प्रकरणी आज पावेत अशा बोगस प्रमाणपत्र देणार्या शिक्षकांवर कारवाई झाली नसल्याचे दिसून येते. अशा शिक्षकांना थेट बडतर्फ करा.