माजलगाव/पाटोदा (रिपोर्टर) विनापरवाना आकडा टाकून वीज घेणार्या व्यक्तीचे वायर काढत असताना वीज कर्मचार्यास धक्काबुक्की करत मारहाण करणार्या तांबा राजुरीतील व्यक्तीविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला तर इकडे माजलगाव तालुक्यात गुंजथळी रोडवर बसचालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी गुंजथळी येथील गोविंद नायबळ याच्या विरुद्ध कलम 353 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक असे की, पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी येथील मदन तांबे याने विनापरवाना आकडा टाकून वीज घेतली होती. त्याची माहिती वीज कंपनीला झाल्यानंतर कंपनीचे कर्मचारी सद्दाम सय्यद हे सदरचे अनाधिकृत वायर कापत असताना मदन तांबे याने तुम्हाला तो अधिकार नसल्याचे म्हणत सद्दाम यांचे गचुरे धरून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पाटोदा पोलिसात मदन तांबेविरोधात गु.र.नं. 17/23 कलम 353, 323, 504 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसरीकडे माजलगाव बस डेपोचे चालक श्रीकांत नारकर हे बस क्र. एम.एच. 20-2052 घेऊन गुंजथडी रस्त्यावरून जात असताना गोविंद नायबळ यांची जनावरे रस्त्यात होती. ती जनावरे बाजुला सार म्हटल्यानंतर आरोपी गोविंद नायबळ याने बसचालकाचे गचुरे धरत त्याला खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी माजलगाव पोलिसात नायबळ यांच्या विरोधात गु.र.नं. 37/23, कलम 353, 323, 504, 506 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.