बँकेचे कामकाज खोळंबले, नोकरभरती करण्याची मागणी
परळी (रिपोर्टर) बँक ऑफ महाराष्ट्रातल्या विविध शाखांमध्ये कर्मचार्यांची कमतरता असल्यामुळे त्याचा ताण इतर कर्मचार्यांवर पडत आहे. भरती तात्काळ करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आज कर्मचार्यांनी दोन दिवसीय संप पुकारला. या संपाचा खातेदारांना चांगलाच फटका बसणार आहे. संप पुकारून कर्मचार्यांनी बँकेच्या दारात निदर्शने केली.
गेल्या अनेक वर्षांपासून बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखांमध्ये कर्मचार्यांची कमतरता आहे. नोकरभरती संदर्भात नुसतेच आश्वासन दिले जातात. 27 जुलै रोजी कर्मचार्यांनी एक दिवसाचा संप पुकारला होता. त्यावेळी संघटनेला आश्वासन देण्यात आले होते. मात्र आश्वासनाची पुर्तता अद्यापही करण्यात आलेली नाही. भरतीचे प्रकरण तात्काळ मार्गी लावावे या मागणीसाठी आज आणि उद्या बँकेच्या कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. परळी येथील शाखेसमोर कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी पृथ्वीराज सोळंके, बालाजी डवरे, पुजा देशमुख, भाग्यश्री साखरे, मिना जोशी, दीपक घाडगे, विलास जोशी, शिवरत्न आघाव यांच्यासह आदींची उपस्थिती होती.