बीड (रिपोर्टर) अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय सेवेचा दर्जा देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी आज संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये कर्मचार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शासनाने कर्मचार्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास कर्मचारी 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
अंगणवाडी सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देण्यात यावा, कर्मचार्यांना मिळणारे वेतन अत्यंत तुटपुंजे असून त्यामध्ये वाढ करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी आज संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. सदरील हा मोर्चा प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, दत्ता देशमुख, कमल बांगर, सचिन आंधळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. मोर्चामध्ये जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका, मदतनिसांसह कर्मचारी सहभागी झाले होते. या पुर्वीही अनेक वेळा कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलने करण्यात आले मात्र याची तितकी दखल शासनाने घेतली नाही. कर्मचार्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत राहिले तर 20 फेब्रुवारीपासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.